Samruddhi Highway : समृद्धी महामार्गाचे उद्दीष्ट हे मुंबई ते नागपूर 8 तासांत अंतर पार करण्याचे आहे. या महामार्गाची लांबी 701 किमी आहे. हा महामार्ग 10 जिल्ह्यांमधील 390 गावांना जोडणारा महामार्ग आहे. मात्र आता या महार्गावरून प्रवास करणे महागणार आहे. या महामार्गावरील टोल दरात वाढ करण्याचा निर्णय ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ’ व ‘नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस-वे लिमिटेड’ या कंपनीने घेतला आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू होणार आहे. त्यामुळे सध्या नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना, चारचाकी वाहनांना १०८० रुपये पथकर मोजावा लागतो तेथे आता १ एप्रिलपासून १२९० रुपये पथकरापोटी खर्चावे लागणार आहेत. १९ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता चारचाकी, हलक्या वाहनांना प्रति किमी २.०६ रुपये, मिनी ट्रक, बससाठी प्रति किमी ३.३२ रुपये, अवजड वाहनांसाठी प्रति किमी १०.९३ रुपये तर अतिजड वाहनांसाठी १३.३० रुपये प्रति किमी असे पथकर दर आकारण्यात येणार आहेत. पथकरातील दरवाढीनुसार नागपूर ते इगतपुरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना १०८० रुपयांऐवजी १२९० रुपये तर हलक्या व्यवासायिक, मिनी बससाठी १७४५ रुपयांऐवजी २०७५ रुपये पथकर भरावा लागेल. बस, दोन आसांच्या ट्रकसाठी ३६५५ रुपयांऐवजी ४३५५ रुपये आणि तीन आसांच्या व्यावसायिक वाहनांसाठी ३९९० रुपयांऐवजी ४७५० रुपये पथकर भरावा लागेल. अवजड बांधकाम यंत्रसामग्रीसाठी ५७४० रुपयांऐवजी आता ६८३० रुपये तर अतिअवजड वाहनांनासाठी ६९८० रुपयांऐवजी ८३१५ रुपये पथकर भरावा लागेल. हे दर ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू असतील. अशी असेल वाढ : नवा पथकर असा (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८) वाहन प्रकार पथकर (रु/किमी) चारचाकी, हलकी वाहने —२.०६ हलकी व्यावसायिक व मालवाहू वाहने, मिनी बस —३.३२ बस, ट्रक (दोन अॅक्सल) —६.९७ तीन अॅक्सल व्यावसायिक वाहन —७.६० अवजड बांधकाम सामग्री —१०.९३ अतिअवजड वाहने (सात अॅक्सल व अधिक) —१३.३० समृद्धी महामार्ग हा राज्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प असून, मुंबई आणि नागपूर दरम्यान प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी तो बांधण्यात आला. या सहा पदरी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर असून, रुंदी १२० मीटर आहे. दि. ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे.