Samia Suluhu Hassan : टांझानिआच्या अध्यक्षपदी सामिया सुलुहू हसन यांची निवड

दोडोमा (टांझानिया) : टांझानियाच्या विद्यमान अध्यक्षा सामिया सुलुहू हसन या देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. निवडणुकीतील गैरव्यवहारांच्या आरोपांमुळे वादग्रस्त झालेल्या या निवडणुकीमध्ये हसन यांना तब्बल ९७ टक्के मते मिळाली असल्याचे जाहीर झालेल्या निकालामध्ये म्हटले आहे. या निकालामुळे निवडणुकीत गैरप्रकार झाल्याच्या टीकेला अधिकच जोर मिळणार आहे. हसन यांच्या दोन प्रमुख विरोधी उमेदवारांना निवडणुकीतून बाद ठरवण्यात आल्यामुळे ही निवडणूक म्हणजे निवडणूक आयोगाबरोबर केलेले संगनमत असल्याचा आरोप विरोधक आगोदरपासूनच करत होते. निवडणुकीत छोट्या पक्षांचे १६ अन्य उमेदवार होते.
मात्र हसन यांच्यापुढे अगदीच नगण्य होते. दिनांक २९ ऑक्टोबरला झालेल्या निवडणुकीनंतर या निवडणुकीचे निकाल जाहीर व्हायला सुरुवात होताच त्याविरोधात देशभर आंदोलन सुरू झाले. देशातील बहुतेक सर्व महत्वाच्या शहरांमध्ये या निवडणुकीविरोधात हिंसक निदर्शने झाली. ही निदर्शने आणि हिंसक आंदोलन दडपण्यासाठी शहरांमध्ये लष्कर तैनात केले गेले आहे.
देशाच्या काही भागांमधील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या आंदोलनामुळे सरकारने विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्था ३ तारखेपर्यंत बंद ठेवल्या गेल्या होत्या. आता ही विद्यापीठे उघडण्याची तारीख पुढे ढकलली आहे. आंदोलनात आतापर्यंत किती ठार आणि जखमी झाले, याचे आकडे सरकारने जाहीर केलेले नाहीत. मात्र १० ठार झाले असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
प्रमुख विरोधक तुरुंगात
निवडणूक प्रक्रियेत सुधारणांची मागणी करणारे चांदेमा गटाचे नेते तुंडू लिस्सा यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात टाकण्यात आले आहे. एसीटी-वाझालेंदो या एका अन्य गटाचे नेते लुहांगा पिना यांना निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांचे अपहरण, अटकसत्र आणि न्यायबाह्य हत्यांचे सत्र झाल्याचा आरोप ऍम्नेस्टी इंटरनॅशनलने केला आहे. एकट्या २०१९ या वर्षात अपहरणाची २०० प्रकरणे झाल्याचे संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क तज्ज्ञांनी म्हटले आहे.





