Sameer Wankhede | Shah Rukh Khan | Aryan Khan | Gauri Khan | Bads Of Bollywood : आयआरएस अधिकारी आणि एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. समीर वानखेडे यांनी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पण केलेल्या “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” या मालिकेबद्दल २ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी करणारा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या मालिकेत त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी “खोटे, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक मजकूर” असल्याचा आरोप समीर वानखेडे यांनी केला आहे. मात्र, आता दिल्ली उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. न्यायालयाने समीर वानखेडे यांना विचारलं की “हे मुंबईतील प्रकरण असताना तुम्ही ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयात का दाखल केली? दिल्लीत याची सुनावणी अपेक्षित असेल तर कोणत्या आधारावर ही सुनावणी घेतली जावी त्याची कारणं विषद करा.” यावेळी न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव म्हणाले, “राष्ट्रीय राजधानीत कारवाईची अपेक्षा का व्यक्त करत आहात?” समीर ज्ञानदेव वानखेडे विरुद्ध रेड चिलीज एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती पुरुषेंद्र कुमार कौरव यांनी याचिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. दरम्यान, यावेळी वानखेडे यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेले वकील संदीप सेठी म्हणाले, “दिल्ली आणि संपूर्ण भारतातीतल इतर प्रेक्षकही ही सीरीज पाहात आहेत. यातून माझ्या आशिलांची मानहानी करण्याचा प्रयत्न केला आहे.” यावर न्यायमूर्ती म्हणाले, “तुम्हाला तुमच्या याचिकेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. तसेच हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात कसं ग्राह्य धरता येईल याबद्दल सविस्तर मुद्दे मांडा.” असं देखील त्यांना यावेळी सुनावलं. नेमकं प्रकरण काय? ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड‘मधील एका विशिष्ट दृश्याचा संदर्भ देत, ज्यामध्ये ‘सत्यमेव जयते’ म्हटल्यानंतर एका पात्राने अश्लील हावभाव केला होता, असा दावा खटल्यात करण्यात आला आहे. हे कृत्य राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१ च्या तरतुदींचे गंभीर आणि संवेदनशील उल्लंघन आहे, ज्या कायद्यानुसार दंडात्मक परिणामांना सामोरे जावे लागते. याशिवाय, मालिकेतील मजकूर माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे, कारण तो अश्लील आणि आक्षेपार्ह सामग्रीच्या वापराद्वारे राष्ट्रीय भावना दुखावण्याचा प्रयत्न करतो. समीर वानखेडे यांनी त्यांच्या खटल्यात कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारांसाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्यासाठी २ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. या खटल्यात शोचे स्ट्रीमिंग आणि वितरण रोखण्यासाठी न्यायालयाचे निर्देश आणि त्याच्या बदनामीकारक स्वरूपाची घोषणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. वानखेडे यांनी असा युक्तिवाद केला आहे की, त्यांच्या वैयक्तिक प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याव्यतिरिक्त, ही सामग्री ड्रग्ज कायदे लागू करण्यासाठी जबाबदार असलेल्या संस्थांवरील विश्वासाला धक्का देते.