Sambit Patra : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; भाजप नेते संबित पात्रा यांनी केली मागणी

बंगळुरू : बंगळुरूमधील व्हिक्टरी परेडवेळी झालेल्या चेंगराचेंगरीची सर्व जबाबदारी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर येते. या चेंगराचेंगरीमध्ये ११ हून अधिक व्यक्तींचा मृत्यु झाल्याने, कसलेही नियोजन नसताना ही परेड आयोजित का केली होती, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणे योग्य राहील. या दुर्घटनेमुळे सिद्धरामय्या यांनी राजीनामा देणे श्रेयस्कर राहील, असे प्रतिपादन भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केले आहे.
संबित पात्रा म्हणाले, बीसीसीआय अध्यक्ष आणि आयपीएल अध्यक्षांनी सांगितले की, त्यांना या व्हिक्टरी परेडची माहिती नव्हती. विजय मिरवणुका यापूर्वीही काढण्यात आल्या आहेत, परंतु विजय मिरवणुका नेहमीच किमान दोन दिवसांनी काढल्या जात असत. गर्दी व्यवस्थापनासाठी योग्य व्यवस्था करण्यासाठी या वेळेचे अंतर आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संघाला विजय मिरवणूक काढण्यास भाग पाडले आणि या सर्व व्यवस्था फक्त १२ तासांत करण्यात आली.
अपुरी तयारी केल्यामुळे या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान चेंगराचेंगरी झाली तेव्हा त्याला अटक करण्यात आली. काँग्रेस सरकारने त्याला अटक करण्याचे आदेश दिले होते. मग आता मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनाही अटक केली जाईल का? राहुल गांधी कुठे आहेत?
संबित पात्रा म्हणाले की, या कार्यक्रमावेळी महत्त्व गर्दी व्यवस्थापनाचे नव्हते, तर महत्त्व नेत्यांच्या जनसंपर्क स्टंटचे होते. या संपूर्ण कार्यक्रमाला कोणी अधिकृत केले? हे राज्य सरकारचे अपयश आहे. त्यांना याची जबाबदारी घ्यावी लागेल. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे राहुल गांधी कुठे आहेत? ते प्रश्न विचारतील का? ते सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांना राजीनामा देण्यास सांगतील का?
जबाबदारी कोण घेणार?
कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र म्हणाले की, चेंगराचेंगरीची जबाबदारी कोण घेणार? जर राज्य सरकारने ते योग्यरित्या व्यवस्थापित केले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती. अहमदाबादमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दीड लाख लोक जमले होते आणि तिथे अशी कोणतीही दुर्घटना घडली नाही. राज्य सरकारने इतक्या घाईघाईने कार्यक्रम का आयोजित केला? काल, योग्य तयारीशिवाय कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न झाला. परवानगी का देण्यात आली? विधानसौधासमोर उत्सव साजरा करण्याची काय गरज होती? उपमुख्यमंत्र्यांनी की मुख्यमंत्र्यांनी हे आयोजन केले होते हे स्पष्ट दिसते आहे.





