उपजिल्हाधिकाऱ्याच्या घराची झाडाझडती; 50 लाखांचं सोनं, मोठं घबाड; खिरोळकरकडं काय काय सापडलं?

छत्रपती संभाजीनगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छत्रपती संभाजीनगर येथील निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना 5 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. शेतजमिनीच्या कामासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 41 लाखांची मागणी केली होती, त्यापैकी 23 लाख रुपये आधीच घेतले होते. उर्वरित 18 लाखांपैकी 5 लाख रुपये घेताना एसीबीने सापळा रचून खिरोळकर यांना अटक केली. त्यांच्या घराची झाडाझडती घेतली असता 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला, यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
जप्त केलेला ऐवज: एसीबीने खिरोळकर यांच्या घरातून 13 लाख 6 हजार 380 रुपये रोख, 589 ग्रॅम (59 तोळे) सोन्याचे दागिने (किंमत 50 लाख 99 हजार 583 रुपये) आणि 3 किलो 553 ग्रॅम चांदीचे दागिने (किंमत 3 लाख 39 हजार 345 रुपये) जप्त केले. एकूण 67 लाख 45 हजार 308 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.
गुन्ह्याचा तपशील: तक्रारदाराला वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये रूपांतरित करायची होती. यासाठी खिरोळकर यांनी 41 लाखांची मागणी केली होती. अव्वल कारकून दिलीप त्रिभुवन यांच्यामार्फत लाच स्वीकारली जात असताना एसीबीने कारवाई केली. खिरोळकर यांना ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.





