संभाजीराजेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट; महायुती सरकारसह विरोधकांवरही साधला निशाणा

Sambhajiraje And Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू आहे. आज उपोषणच्या सातव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली आहे. तसेच त्यांच्या प्रकृतीबद्दल संभाजीराजेंनी चिंता व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे.
“एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची दखल किंवा त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. मनोज जरांगेंचा जीव तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलो आहे. मला दु:खी वाटतं, वेदना होत आहे. आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं आहे,” असं संभाजीराजे म्हणाले. Sambhajiraje And Manoj Jarange Patil |
….तर सरकार आणि विरोधी पक्ष जबाबदार असेल
पुढे ते म्हणाले, “सरकार निवांत मुंबईत एअर कंडिन्शन्स ऑफिसात बसले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. ही काय पद्धत आहे? सरकारकडे मेडिकल रिपोर्ट जातो. मेडिकल रिपोर्ट इतका वाईट आहे. काहीही होऊ शकतं. उद्या काही झालं तर सरकार आणि विरोधी पक्ष जबाबदार असेल. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत सरकारने अजून निर्णय घेतलेला नाही. तुम्ही सत्तेत बसला आहात. विरोधी पक्षातील नेत्यांनीही सरकार कसे आरक्षण देणार आहे यावर भाष्य करायला पाहिजे. हे आरक्षण कसं टिकणार यावर बोला,” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. Sambhajiraje And Manoj Jarange Patil |
“मनोज जरांगे पाटलांनी तब्येत सांभाळायला पाहिजे. मी त्यांच्याशी बोललो आहे. मनोज जरांगे पाटलांच्या सोबत मी आधीसुद्धा होतो. आताही आहे आणि पुढे सुद्धा ठामपणे उभा असणार. मी सरकारला सांगू इच्छितो की ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा देखील समावेश होता,” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
काय परिस्थीती आहे ते बघा
यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “माझी सरकारला विनंती आहे. इकडे या आणि काय परिस्थीती आहे ते बघा. तुमच्याकडे हेलिकॉप्टर आहेत. सगळ्या यंत्रणा आहेत तुमच्याकडे. इथं जर काही झालं तर सरकार जबाबदार असणार. विरोधकही तेवढेच जबाबदार असतील,” असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी महायुती सरकारला दिला.




