समरजीत घाटगे याचं ठरलं! कागल विधानसभा मतदारसंघात ‘तुतारी’ हाती घेणार

कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्याचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी कागल विधानसभेसंबंधी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपपासून दूर झालेले समरजीत घाटगे यांनी आज आगामी विधानसभेसंबंधी भूमिका जाहीर केली आहे. समरजीत घाटगे यांनी आज (शुक्रवार) कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
समरजीत घाटगे हे कागल विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. महाराष्ट्रात झालेल्या राजकारणाच्या उलटफेरानंतर अनेक मतदारसंघात स्थानिक समीकरणे बदलली आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा महायुतीत समावेश झाल्यामुळे कागल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना सुटणार असल्याचे मानले जाते. त्यामुळे समरजीत घाटगे यांना माघार घ्यावी लागणार होती. मात्र निवडणूक लढायचीच अशी तयारी घाटगेंनी केली आहे. त्यासाठी कार्यकर्ते आणि समर्थकांचे मत जाणून घेण्यासाठी त्यांनी आज बैठक बोलवली होती.
समरजीत घाटगे यांनी तुतारी या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने निवडणूक लढवावी, अशी मागणी आणि आग्रह त्यांच्या समर्थकांनी केला. घाटगे यांनीही त्याला होकार दिला आहे. समर्थकांसोबतची बैठक सुरु असतानाच त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा फोन आला. बैठकीतील वक्त्यांचे भाषण थांबवून घाटगेंनी पाटील यांच्यासोबत संवाद साधला. आजच पक्ष प्रवेश करावा असा आग्रह पाटील यांचा आहे, काय करावे, असे घाटगेंनी समर्थकांना विचारले आणि आजच कोल्हापूरमध्ये पक्ष प्रवेश करण्याचे निश्चित झाले.
कागल मतदारसंघात अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ विरुद्ध शरद पवार गटाचे समरजीत घाटगे अशी लढत आगामी विधानसभेत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.





