‘चीन आपला शत्रू नाही’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे नवा वाद, भाजपकडून जोरदार टीका

Sam Pitroda on China | काँग्रेस नेते सॅम पित्रोदा अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता चीनबाबत केलेल्या वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पित्रोदा यांनी चीनबाबत केलेल्या नवीन वक्तव्यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे.
भारताने चीनला शत्रू मानणे बंद केले पाहिजे, असे पित्रोदा यांनी म्हटले आहे. तसेच, त्यांनी अमेरिकेलाही लक्ष्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता भाजपकडून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.
सॅम पित्रोदा यांना पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चीनकडून धोका असल्याचे अनेकदा वाढवून दाखवले जाते. आता वेळ आली आहे की आपण शेजारी देशाला ओळखावे आणि त्याचा सन्मान करावा. भारताने आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे आणि चीन हा शत्रू आहे ही धारणा सोडण्याची आवश्यकता आहे.
भारताचा दृष्टिकोन नेहमीच संघर्षात्मक राहिला आहे, ज्यामुळे शत्रुत्व वाढते. हा दृष्टिकोन बदलायला हवा. आपल्याला नेहमीच चीनला शत्रू मानावे लागेल असे नाही आणि ही मानसिकता केवळ चीनपुरतीच नाही तर सर्व देशांसाठी असावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मला माहित नाही की चीनकडून नेमका कोणता धोका आहे. मला वाटते की या मुद्द्याला अनेकदा गरजेपेक्षा जास्त वाढवून दाखवले जाते. कारण अमेरिकेला नेहमीच एक शत्रू शोधण्याची गरज असते, असेही ते म्हणाले.
चीन प्रगती करत आहे… आपल्याला हे ओळखणे आणि समजून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक देश पुढे जात आहे. जे खूप गरीब आहेत, त्यांना वेगाने वाढावे लागेल, तर संपन्न देशांची वाढ मंदावेल. विकसित देशांची लोकसंख्या वृद्ध होत जाईल, तर विकासशील देशांची लोकसंख्या तरुण असेल. आपल्याला या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पाहायला हव्यात, असे मतही पित्रोदा यांनी व्यक्त केले. मात्र, पित्रोदा यांच्या या वक्तव्यांमुळे नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे. यावरून भाजपकडून काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे.





