Sam Pitroda : पित्रोदा यांना पदावरून हटवावे; आयओसीचे उपाध्यक्ष जॉर्ज अब्राहम यांचे खर्गेंना पत्र
कॅनडातील एका सक्रिय सदस्यानेही पित्रोदा (Sam Pitroda) यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान मोदींच्या राजकीय विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करतानाच, त्यांना आपला जुना मित्र आणि गुजराती मित्र असल्याचे म्हटले होते.

Sam Pitroda : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक स्वभावाचे कौतुक केल्यानंतर इंडियन ओव्हरसीज काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आले आहेत. आयओसीचे उपाध्यक्ष जॉर्ज अब्राहम यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून अध्यक्ष सॅम पित्रोदा (Sam Pitroda) यांच्या विधानाचा निषेध केला असून, त्यांना तात्काळ परदेशी शाखेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याची मागणी केली आहे.
कॅनडातील एका सक्रिय सदस्यानेही पित्रोदा (Sam Pitroda) यांच्याविरोधात भूमिका घेतली आहे. गेल्या आठवड्यात सॅम पित्रोदा यांनी पंतप्रधान मोदींच्या राजकीय विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करतानाच, त्यांना आपला जुना मित्र आणि गुजराती मित्र असल्याचे म्हटले होते. मोदींना त्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रेमळ, दयाळू आणि काळजी घेणारा व्यक्ती म्हणून संबोधले होते.
तसेच, गुजरातमध्ये आपण पंतप्रधानांच्या घरी गेल्याची आठवण सांगत त्यांच्याशी कोणताही वैयक्तिक वाद नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर दोघांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण झाली आणि पंतप्रधानांनी त्यांना सॅम भाई असे संबोधले होते. जॉर्ज अब्राहम यांनी वैयक्तिक संबंध आणि राजकीय मतभेदांमध्ये शालीनता जपण्याची गरज मान्य केली असली, तरी सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला.
त्यांनी पित्रोदा यांना पाठवलेल्या सविस्तर ईमेलमध्ये म्हटले आहे की परदेशातील भारतीय समुदायामध्ये धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांबाबतच्या चिंता मांडण्यासाठी काँग्रेस आधीच प्रयत्नशील आहे.अशा परिस्थितीत संस्थेच्या अध्यक्षांनीच सार्वजनिकरीत्या मोदींच्या वैयक्तिक गुणांची एवढी प्रशंसा केल्यास, अनेकांना वैयक्तिक मैत्री आणि राजकीय समर्थन यातील फरक समजणे कठीण होईल. वैयक्तिक दयाळूपणा वेगळी गोष्ट आहे; मात्र राजकीय सत्तेचा वापर आणि लाखो लोकांवर होणारे त्याचे परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत.
अब्राहम यांनी आपल्या पत्रात नेत्यांच्या मूल्यांकनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या मते, नेत्यांना ते आपल्या मित्रांशी कसे वागतात यावरून नाही, तर आपल्या अखत्यारीतील सर्वात दुर्बल घटकांशी कसे वागतात यावरून इतिहास जोखतो.
हजारो नागरिकांच्या विस्थापनासारख्या घटनांचा दाखला देत त्यांनी विचारले की, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू झाल्यानंतर पंतप्रधानांना तिथे जाण्यास दोन वर्षांहून अधिक काळ लागला, मग पीडितांसाठी ती संवेदना आणि आपुलकी कुठे होती? असहमत असलेल्या, वेगळ्या पद्धतीने उपासना करणाऱ्या किंवा कमी राजकीय शक्ती असलेल्या घटकांशी कसे वागले जाते, यावरून खरी दया मोजली गेली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कॉंग्रेसच्या आयओसी या परदेशी शाखेत विरोध सुरू असतानाही, अमेरिकेच्या सध्याच्या दौऱ्यात सॅम पित्रोदा (Sam Pitroda) हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत सातत्याने दिसून आले आहेत.






