वारंवार कुराण जाळणारा सलवान मोमिका नेमका कोण होता ? ; ज्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली

Salwan Momika । सध्या जगभर एकाच व्यक्तीची चर्चा होत आहे. त्याचे नाव सलवान मोमिका आहे. त्याचे कारणही तसेच आहे. वारंवारपणे इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराण जाळणाऱ्या सलवान मोमिका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. २९ जानेवारी रोजी रात्री स्टॉकहोमजवळील सोडेटेल परिसरात मोमिकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सलवान हा एक इराकी नागरिक होता ज्याचा मृतदेह स्वीडनमध्ये सापडला होता. काही दिवसांपूर्वी त्याने इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणच्या अनेक प्रती जाळल्या होत्या.
सलवान मोमिका हा एक माजी इराकी मिलिशिया नेता होता. जो सत्ता संघर्षानंतर इराकमधून पळून गेला होता. गेल्या बुधवारी त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. ३८ वर्षीय मोमिकावर स्टॉकहोमजवळील सोडेटेल परिसरात गोळ्या झाडण्यात आल्या.
स्वीडिश मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोमिका टिकटॉकवर लाईव्ह-स्ट्रीमिंग करत होता तेव्हा त्याला गोळी लागली. रॉयटर्सने एक व्हिडिओ मिळवला आहे ज्यामध्ये पोलिस त्याचा फोन काढून घेत लाईव्हस्ट्रीम बंद करताना दिसत आहेत.
२०२३ मध्ये ईदनिमित्त कुराण जाळल्यानंतर चर्चेत आला Salwan Momika ।
२०२३ मध्ये, ईदच्या निमित्ताने त्याने मुस्लिम धार्मिक ग्रंथ कुराणचा अपमान केला तेव्हा तो चर्चेत आला. स्वीडनची राजधानी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर सलवानने कुराणच्या प्रती जाळल्या.
सलवानचा कुराण जाळण्याचा व्हिडिओ जगभरात व्हायरल झाला. यामुळे अनेक मुस्लिम देशांमध्ये संताप निर्माण झाला. या प्रकरणी स्टॉकहोम न्यायालयात त्याच्याविरुद्ध खटला सुरू होता, ज्याचा निकाल गुरुवारी देण्यात येणार होता, परंतु त्यापूर्वीच बुधवारी त्याचे निधन झाले.
सलवान मोमिका कोण होता? Salwan Momika ।
सलवान मोमिकाचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. त्याचे कुटुंब उत्तर इराकमधील ताल अफार या शहरात राहत होते. सलवान मोमिक हा ख्रिश्चन होता जो नंतर नास्तिक बनला. जरी त्याने स्वतःला माजी मुस्लिम म्हणून संगितले असले तरी तो ज्या संघटनेशी संबंधित होता ती इमाम अली ब्रिगेड्स अंतर्गत येते. ही संघटना २०१४ मध्ये स्थापन झाली आणि तिच्यावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप आहे.
सलमान मोमिका स्वीडनला कशी पोहोचला ?
दरम्यान , सलवान मोमिका २०१८ मध्ये इराकहून स्वीडनला पोहोचला. त्याला स्वीडनमध्ये तीन वर्षांचा निवास परवाना देण्यात आला. या काळात, २०२३ मध्ये, त्याने कुराणचा अपमान केला. या घटनेनंतर सर्व मुस्लिम देशांमध्ये संताप पसरला आणि मुस्लिम देशांनी स्वीडनला मोमिकाला आश्रय देऊ नये असे आवाहन केले. दरम्यान, सलवान मोमिका यांनी २०२३ मध्ये पुन्हा स्वीडनमध्ये राहण्यासाठी परवाना मागितला होता. मात्र यावेळी मुस्लिम देशांच्या नाराजीमुळे स्वीडनने सलवान मोमिका यांना परवानगी देण्यास नकार दिला. स्वीडनने म्हटले होते की, त्याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्रे नाहीत आणि त्यामुळे त्याला पुन्हा परवाना दिला जाणार नाही.





