Bhandara News : ताई तुझ्या धैर्याला सलाम! घरी वडिलांचे पार्थिव अन् लेकीने दिला बारावी इंग्रजीचा पेपर, वडिलांचे ते शब्द आठवले अन्…
Bhandara News : वडिलांचे शब्द तिला आठवत होते आणि जड अंतकराने जान्हवी परीक्षा केंद्रावर पोहचली.

Bhandara News : बारावीची परीक्षा सुरू झाली असून, पेपरच्या आदल्या दिवशी एक मन हेलावून टाकणारी घटना भंडारा जिल्ह्यातील तूमसरमध्ये घडली. ९ फेब्रुवारीला सोमवारी दुपारी जान्हवी राहांगडाले हिच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
घरातील आधारवडच अचानक सोडून गेल्याने जान्हवीवर मोठा आघात झाला. दुसऱ्याच दिवशी बारावीचा पहिलाच पेपर आता काय करायचं असा प्रश्न तिच्या मनाला भेडसावू लागला. एका बाजूला वडिलांचं पार्थिव घरात पडलेलं, नातेवाइकांचा आक्रोश….पण दुसरीकडे आयुष्याचं वळण ठरवणारी बारावीची परीक्षा! या मोठ्या दुःखद प्रसंगातून जड अंतकरणाने जान्हवीने परीक्षा केंद्र गाठलं आणि पेपर दिला.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील आंबागड येथील हृदयद्रायक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जान्हवीचे वडील हौशीलाल राहांगडाले यांचे अपघातात निधन झाले.
परीक्षेला जाण्याअगोदर जान्हवीला वडिलांचे ते शब्द आठवत होते. “शिका आणि मोठी व्हा,” वडिलांच्या पार्थिवाला घरात ठेवून, जड पावलांनी जान्हवी मामाच्या मुलासोबत परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि डोळ्यांतून आसवांसह तिने मोठ्या धैर्याने पेपर दिला.
आंबागड ते तुमसर असा 8 किलोमीटरचा प्रवास करून ती परीक्षा केंद्रावर आली. पेपर लिहिताना प्रत्येक शब्दामागे वडिलांचा चेहरा तिला दिसत होता. पेपर संपला, तिने घराकडे धाव घेतली आणि त्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जान्हवीने दाखवलेल्या या धैर्याने सर्वजण नतमस्तक झाले.
लोकलमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
दुसरीकडे बारावीच्या पेपरच्या पहिल्याच दिवशी घरातून निघालेल्या एका विद्यार्थ्यावर काळाने झडप घातली आणि त्याचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली. सोहम कटरे असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





