Salman Khan: अभिनेत्री काजोल आणि ट्विंकल खन्ना या दोघी सध्या त्यांच्या ‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ या नवीन शोमुळे चर्चेत आहेत. हा शो गुरुवार, २५ सप्टेंबर रोजी अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्याच भागात बॉलिवूड सुपरस्टार्स सलमान खान आणि आमिर खान यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये सलमान आणि आमिरसोबत इतरही काही कलाकारांची झलक पाहायला मिळाली. पहिल्या भागात या दोन्ही अभिनेत्यांसोबत काजोल आणि ट्विंकल मोकळ्या गप्पा मारताना दिसतील. रिलेशनशिपबद्दल सलमानचा विचार शोमध्ये आमिर आणि सलमाननं त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काही आठवणी शेअर केल्या. रिलेशनशिपबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “नात्यामध्ये जर एकाच व्यक्तीची प्रगती जास्त होत असेल तर दुसऱ्याला असुरक्षितता जाणवू शकते. त्यामुळे नातं टिकवण्यासाठी दोघांचीही एकत्र प्रगती व्हायला हवी.” आमिरनं सलमानला त्याच्या भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल विचारलं तेव्हा त्यानं स्पष्टपणे उत्तर दिलं, “नाही जुळलं, तर नाही जुळलं. जर दोष द्यायचाच असेल, तर तो माझाच आहे.” मुलांबद्दल व्यक्त केली इच्छा यादरम्यान सलमाननं भविष्यातील एका इच्छेबद्दलही सांगितलं. तो म्हणाला, “एक दिवस मलाही मुलं असतील… लवकरच.” शोबद्दल काजोल आणि ट्विंकलचं मत काजोल म्हणाली, “हा कार्यक्रम आम्ही सुरू केला कारण आम्हाला गप्पा मारायला, मित्रांबद्दल, इंडस्ट्रीबद्दल बोलायला खूप आवडतं. इथे कुणीही ठराविक होस्ट नसणार आणि सगळं काही स्क्रिप्टशिवाय, नैसर्गिक पद्धतीनं होणार आहे.” तर ट्विंकलनं सांगितलं, “आम्हाला कलाकारांकडून खरी आणि त्या क्षणी दिलेली उत्तरं हवी आहेत. त्यामुळे अशा गोष्टी विचारू ज्याबद्दल लोकांना उत्सुकता असेल. यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांविषयी नवी माहिती मिळेल.”