Katrina Kaif : कतरिनाच्या वाढलेल्या वजनावरून ट्रोलिंग.! माजी खासदार संतपल्या; सलमान सुद्धा अभिनेत्रीच्या समर्थनार्थ मैदानात
कतरिनाच्या बॉडी शेमिंगचा मुद्दा आता ‘बिग बॉस 20’च्या मंचावरही पोहोचला. 20 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने कतरिनाला लक्ष्य करणाऱ्या ट्रोलर्सवर जोरदार टीका केली.

Katrina Kaif : बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासोबतच फिटनेस आणि ग्लॅमरस लूकसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री कतरिना कैफ सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. मात्र, यावेळी तिच्या आगामी सिनेमामुळे नव्हे, तर आई झाल्यानंतर तिच्या शरीरात झालेल्या नैसर्गिक बदलांवरून सुरू झालेल्या सोशल मीडिया ट्रोलिंगमुळे तिचं नाव चर्चेत आलं आहे.
कतरिनाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर काही युजर्सनी तिच्या वाढलेल्या वजनावरून कमेंट्स करत तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या प्रकारावर आता राजकारणापासून बॉलिवूडपर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या मुलाचं स्वागत केलं. मुलाच्या जन्मानंतर कतरिनाने काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि रुपेरी पडद्यापासून अंतर ठेवलं. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अंबानी कुटुंबाच्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात कतरिना पती विकी कौशलसोबत दिसली.
या कार्यक्रमातील तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र, अभिनेत्रीचा लूक पाहून काही सोशल मीडिया युजर्सनी तिच्या शरीरयष्टीवर आणि वजनावर अनावश्यक टिप्पणी करण्यास सुरुवात केली. काहींनी तर तिच्या जुन्या आणि सध्याच्या लूकची तुलना करत तिला लक्ष्य केलं.
कतरिनावर होणाऱ्या या बॉडी शेमिंगवर माजी राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत महिलांच्या शरीरावर टिप्पणी करणाऱ्यांना सुनावलं.
Dear women,
You don’t need to explain your weight gain, weight loss, your age, your look, your body or your skin to all those jobless enough to comment on it.
Whether its Katrina today or someone else tomorrow we owe no explanation to anyone- our life, our body, our choices.— Priyanka Chaturvedi🇮🇳 (@priyankac19) September 18, 2026
त्यांनी म्हटलं की, वजन वाढणं किंवा कमी होणं, वय, दिसणं, शरीरयष्टी किंवा त्वचेवर टिप्पणी करणाऱ्या लोकांना महिलांनी कोणतंही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. आज कतरिना आहे, उद्या दुसरी कोणतीही महिला असू शकते; प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याबाबत आणि स्वतःच्या शरीराविषयी निर्णय घेण्याचा अधिकार आहे.
त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. विशेष म्हणजे, अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर यांनीही कतरिनाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली. महिलांच्या शरीरातील बदलांवर समाजाकडून होणाऱ्या दुहेरी निकषांवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
आता सलमान खानही ट्रोलर्सवर भडकला….
कतरिनाच्या बॉडी शेमिंगचा मुद्दा आता ‘बिग बॉस 20’च्या मंचावरही पोहोचला. 20 सप्टेंबर 2026 रोजी प्रसारित झालेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खानने कतरिनाला लक्ष्य करणाऱ्या ट्रोलर्सवर जोरदार टीका केली. त्याने गर्भधारणेनंतर महिलांच्या शरीरात बदल होणं ही नैसर्गिक बाब असल्याचं सांगत, एखाद्या महिलेच्या दिसण्यावरून तिच्यावर टिप्पणी करण्याला विरोध केला.
सलमानने ट्रोलिंगला अत्यंत चुकीचं आणि असंवेदनशील वर्तन असल्याचं म्हटलं. कतरिना पुन्हा काम सुरू करेल तेव्हा तिच्या फिटनेसबाबत ती स्वतः निर्णय घेईल; त्यामुळे तिला वेळ आणि अवकाश देण्याची गरज असल्याचा त्याचा सूर होता.





