सप्टेंबरमध्ये प्रवासी, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या विक्रीत वाढ

नवे दिल्ली – जीएसटीत घसघसीत झालेली कपात आणि पावसामुळे निर्माण झालेले उत्साहवर्धक वातावरण यामुळे उत्सवाच्या काळात सप्टेंबर महिन्यात प्रवासी, दुचाकी, तीन चाकी वाहनांची विक्री वाढण्यास मदत झाली असल्याची माहिती सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स या संस्थेने जारी केली आहे.
सप्टेंबरमध्ये कंपन्यांनी वितरकांना विकलेल्या प्रवासी वाहनांच्या संख्येत 4% वाढ होऊन ही संख्या 3.72 लाख झाली. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही संख्या 3.56 लाख युनिट होती. दुचाकी विक्री सात टक्क्यांनी वाढून 21.68 लाख युनिट झाली आहे. गेल्या वर्षी ही संख्या 20.25 लाख युनिट होती. सप्टेंबर महिन्यात तीन चाकी वाहनांची विक्री 5.5 टक्क्यांनी वाढून 84,077 युनिट झाली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ही संख्या 79,683 युनिट होती.
जीएसटी सुधारणामुळे राष्ट्रीय उत्पन्नात मोठे योगदान असलेल्या वाहन क्षेत्राचा विकास होणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासही मदत होणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत वाहन विक्री 1.5 टक्क्यांनी कमी होऊन 10.30 लाख युनिट झाली. कारण या कालावधीत जीएसटीचा दर जास्त होता. त्यामुळे या तिमाहीच्या पहिल्या दोन महिन्यात विक्री वाढण्याऐवजी कमी झाल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
एसयूव्ही प्रकाराच्या प्रवासी वाहनाचे आकर्षण कमी झालेले नाही. या तिमाहीत या वाहनांच्या विक्रीत तब्बल 56 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या वाहनांची विक्री 29 टक्क्यांनी वाढली होती. मात्र आता एसयूव्ही प्रकाराच्या वाहनांची विक्री स्थिर होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. पहिल्या तिमाहीत दुचाकीची विक्री सात टक्क्यांनी कमी होऊन 55.62 लाख युनिट झाली. मात्र आता परिस्थिती सकारात्मक झाली आहे.
सप्टेंबरमध्ये विक्रमी विक्री –
22 सप्टेंबर रोजी जीएसटी दर कपातीची अंमलबजावणी झाली. त्यापूर्वी ग्राहकांनी वाहन खरेदी टाळली होती. म्हणजे सप्टेंबर महिन्यातील केवळ नऊ दिवस वितरकांना वाहनांची विक्री करता आली. मात्र तरीही सप्टेंबर महिन्यामध्ये या नऊ दिवसाच्या काळात इतकी विक्री झाली की सप्टेंबर महिन्यातील हा वाहन विक्रीचा उच्चांक ठरला आहे. आगामी काळाबाबत आम्ही आशावादी आहोत असे या संघटनेचे अध्यक्ष शैलेश चंद्रा यांनी सांगितले. छोट्या वाहनावर जास्त जीएसटी होता तो या संघटनेच्या पाठपुराव्यामुळे कमी झाला असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.




