वाल्हे : पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील,पुणे- मिरज लोहमार्गावर,वाल्हे- नीरा (ता.पुरंदर) दरम्यानच्या पिसुर्टी रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ या रेल्वे फटकातील लोहमार्ग ओलांडने मागील काही दिवसांपासून दुचाकी तीनचाकी वाहनास चिकीरीचे बनले आहे. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील या रेल्वेगेट मधील लोहमार्गाचे विस्तारीकरणाचे काम मागील दोन वर्षांपूर्वी गतीने पुर्ण करण्यात आले आहे. मात्र, मोठ्याप्रमाणावर वर्दळीच्या पालखी महामार्गावरील पिसुर्टी रेल्वेगेट मधील लोहमार्ग ओलांडताना अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होऊ लागले असून, यामुळे अनेकजण कायमचेच जायबंदी होत आहेत. मात्र, यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही दखल घेतली नसल्याने, प्रवाशीवर्गामधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोमवार (दि.१८) सकाळपासूनच या परिसरात संततधार पाऊस पडत असल्याने,लोहमार्ग ओलसर झाल्याने,व दुसर्या रेल्वे लाईनचे करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी व जुन्या रेल्वे रुळाचे घर्षण झाल्याने अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होऊ लागल्याने दुचाकीस्वार भयभीत होऊन, दुचाकी घसरण्याचे प्रमाण वाढत आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास,दुचाकीवरून चाललेले एक पुरुष व महिला येथील लोहमार्गावरून, दुचाकी वाहन घसरल्याने, एसटी बस च्या पुढच्या चाकाखाली जाताना वाचली असून,सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर,येथून प्रवास करण्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. मंगळवारी ही सकाळपासून रिमझीम पाऊस सुरू असून, या परिसरात दुचाकीस्वार घसरून अपघात घडत आहेत. याच परिसरात अनेक लहान-मोठे खड्डे पडले असून,या ठिकाणी दुचाकी लोहमार्गावर जात असताना महामार्गापेक्षा जुना लोहमार्ग थोडा उंच,तसेच रस्त्यावरील वाहने तिरकी जात असल्याने,व लोहमार्गाच्या अगदी जवळच रस्ता खराब झाल्याने,लोहमार्गावरून अनेक दुचाकीस्वार घसरून अपघात होत आहेत. दरम्यान,जुना लोहमार्ग ओलांडत असताना यावेळी अनेक दुचाकीस्वार घसरून पडल्याने,अनेकांना दुखापत झाली असून,यामुळे रेल्वे प्रशासनाविरुद्ध तीव्र संताप प्रवाशीवर्गामधून व्यक्त होत होता. या ठिकाणाची दुरुस्ती लवकरात लवकर करण्याची मागणी प्रवाशी वर्गाकडून होत असून, संबंधित विभागाने तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी प्रवाशी वर्गासह स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे. यापूर्वीही देखील अनेकदा या ठिकाणी अनेक दुचाकी,तीनचाकी वाहन घसरून अपघात होतच होते. तेव्हा तात्पुरती उपायोजना म्हणून, बारदाना (पोते) टाकल्याने, वाहन घसरण्याचे प्रमाणात कमी होत होते.यामुळेच तात्पुरती उपायोजना म्हणून येथील गेटमेन रेल्वेगाडी गेल्यानंतर, लोहमार्गावर बारदाना पोते टाकून,अपघात टाळण्याचे प्रयत्न करीत आहेत. पुणे-पंढरपुर पालखी महामार्गावरून, दुचाकीने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना ‘दैनिक प्रभात’ च्या माध्यमातून विनंती करण्यात येते की पिसुर्टी येथील रेल्वेगेट ओलांडताना दुचाकी वाहन सावकाश चालवावे. लोहमार्ग ओलसर असल्याने, येथे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता आहे.