कॉर्पोरेट क्षेत्रातील बड्या अधिकाऱ्यांचे वेतन पहा; एका सीईओला पंतप्रधानांच्याही 8 पट जास्त

Corporate sector top executives salary : भारतातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांमधील बॉस लोकांचे वेतन किती असते, याबद्दल सर्व सामान्यांच्या मनात कायमच कुतूहल असते. त्यामुळेच या संदर्भातील जी आकडेवारी समोर आली आहे त्यातून असे दिसते की आलिशान एसी केबिनमध्ये बसणाऱ्या या बॉस लोकांना वेतन देण्यात कंपन्या कुठलीही कसर ठेवत नाहीत.
शेअर बाजाराशी निगडित निफ्टी-फिफ्टी या निर्देशांकात असणाऱ्या 50 बड्या कंपन्या मधील विप्रो, हिरो मोटोकॉर्प आणि बजाज फायनान्स यांचा विचार केला तर 2024 या आर्थिक वर्षात विप्रोचे दिअरी देलपोर्ट (ज्यांनी एप्रिल महिन्यात राजीनामा दिलेला आहे) हिरो मोटोकॉर्पचे पवन मुंजाळ आणि बजाज फायनान्स चे राजीव जैन यांना प्रत्येकी 100 कोटी रुपयांहून अधिक वेतन मिळालेले आहे. यातील जैन आणि देलपोर्ट यांच्या वेतनात वर्षभरातच दुपटीने वाढ झाली असल्याचे दिसून येते.
ब्लुमबर्ग आणि एस इक्विटीज यांच्याकडील आकडेवारीवरून असे दिसून येते की वर्षभरापूर्वी देलपोर्ट यांचे वेतन वार्षिक 83 कोटी रुपये होते त्यामध्ये कंपनीने वाढ करून 2024 या आर्थिक वर्षात त्यांचे वेतन 167 कोटी रुपयांवर नेले होते. त्याचप्रमाणे बजाज फायनान्स हे राजीव जैन यांचे वार्षिक वेतन 49 कोटींवरून 101 कोटी रुपयांवर वर्षभरात पोचले आहे.
डेलाईट इंडिया मधील सीएचआरओ प्रोग्राम लीडर असणारे आनंदरूप घोष यांच्या सांगण्यानुसार भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी अर्थात सीईओंच्या वेतनामध्ये गेल्या काही वर्षात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. अर्थात जागतिक पातळीवर विचार केला तर भारतातील मध्यम वर्गातील कंपन्यांमधील सीईओंना वर्षाला दहा कोटी रुपयांचे वेतन असते. त्या तुलनेत अमेरिकेमध्ये याच वर्गातील सीईओ चे वेतन सुमारे 14 ते 15 लाख डॉलर्स असते. रुपयांमध्ये याचा विचार केला तर अमेरिकेतील सीईओंचे वेतन वार्षिक 120 कोटी रुपये असते. भारताचे पंतप्रधान यांना विविध भत्त्यांसह दरमहा 1 लाख 66 हजार रुपये वेतन मिळते.
१) विप्रो – सीईओ/एमडी दिअरी देलपोर्ट 167 कोटी
२) हीरो मोटोकॉर्प चेअरमन पवन मुंजाळ 109.41 कोटी
३) बजाज फायनान्स व्यवस्थापकीय संचालक राजीव जैन 101.40 कोटी
४) अदानी एंटरप्राईजेस सीईओ विनय प्रकाश 89.37 कोटी रुपये
५) जेएसडब्लू स्टील चेअरमन सज्जन जिंदल 73.39 कोटी रुपये
६) इन्फोसिस व्यवस्थापकीय संचालक सलील एस पारेख 66.25 कोटी रुपये
७) हिंदल्को इंडस्ट्रीज व्यवस्थापकीय संचालक सतीश पै 64.71 कोटी रुपये
८) दिवीज लॅबोरेटरीज व्यवस्थापकीय संचालक मुरली के दिवी 64.06 कोटी रुपये
९) बजाज ऑटो व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज 53.75 कोटी रुपये
१०) लार्सन अँड टुब्रो व्यवस्थापकीय संचालक एस. एन. सुब्रमण्यम 51.05 कोटी





