साक्षी छाजेडने रचला इतिहास! लंडन येथील मानाच्या जलतरण स्पर्धेत ठरली सर्वोत्तम फिनिशर

बिबवेवाडी: पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती मनोज छाजेड यांची कन्या साक्षी हिने पुन्हा एकदा देशाची मान अभिमानाने उंचावली आहे. तिने लंडन येथे पार पडलेल्या मानाच्या जलतरण स्पर्धेत सर्वोत्तम फिनिशर ठरत देदीप्यमान कामगिरी केली आहे.
साक्षी हिने २९ मार्च २०२५ रोजी लंडन येथील प्रतिष्ठित अॅक्वाटिक्स सेंटर येथे झालेल्या २.५ कि.मी.च्या स्विमॅथॉन यूके २०२५ या जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला. तिने ही शर्यत अवघ्या ४६ मिनिटांत पूर्ण करत प्रति १०० मीटरला १.९ मिनिटांचा वेग गाठला. त्यामुळे तिला एक सर्वोत्तम फिनिशर म्हणून गौरविण्यात आले. स्विमॅथॉन ही जगातील सर्वात मोठी निधी संकलन जलतरण स्पर्धा आहे, जी १९८६ पासून लंडनमध्ये सुरू आहे.
ही स्पर्धा म्हणजे त्या देशात १९८८ पासून राष्ट्रीय कार्यक्रम बनली आहे. यात जगभरातून लाखोच्या संख्येने स्पर्धेक सहभाग नोंदवतात. यातून कर्करोग संशोधनासह विविध धर्मादाय संस्थांसाठी ५० दशलक्ष पॅाउडपेक्षा जास्त निधी उभारला जातो. प्रसिद्ध वास्तुविशारद झाहा हदीद यांनी डिझाइन केलेले लंडन अॅक्वाटिक्स सेंटर हे एक प्रतिष्ठित ठिकाण आहे, ज्याने २०१२ च्या लंडन ऑलिंपिकचे आयोजन केले होते. ज्यामध्ये मायकेल फेल्प्ससारखे प्रमुख जलतरणपटू होते. स्विमॅथॉनची जागतिक स्तरावरील दोन सर्वात मोठ्या कर्करोग संशोधन संस्थांपैकी एक असलेल्या कॅन्सर रिसर्च यूके आणि मेरी क्युरी यांच्याशी भागीदारी आहे.
साक्षी ही राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे. तिने राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तिने तिच्या असाधारण प्रतिभेचे प्रदर्शन करून अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. तीन वर्षांच्या वयात स्पर्धात्मक पोहण्यास सुरुवात करणारी साक्षी एक जबरदस्त जलतरणपटू बनली आहे. ज्यामुळे तिच्या कुटुंबाचा आणि देशाचा अभिमान वाढला आहे.





