नगर | संत ज्ञानेश्वर मंदिरही महाराजांविना पोरके

नेवासा, (प्रतिनिधी)- जगाच्या नकाशावर धार्मिकदृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या श्री तीर्थक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर सध्या ‘साधू विना पोरके’ झाले आहे. मराठी भाषेचे उगमस्थान असणाऱ्या व जगाला ‘पसायदान’ देणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरामध्ये हभप महाराजांची नेमणूक करण्याची मागणी भाविकांकडून केली जात आहे.
येथील देवस्थानचे विश्वस्त हभप शिवाजी महाराज देशमुख हे या मंदिराचा कारभार पाहत होते. नेवासा येथील वकील संघाने त्यांच्याविरोधात संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानावर मोर्चा काढलेला होता. त्यामुळे देशमुख महाराज सध्या काम पहात नसल्यामुळे ज्ञानेश्वर मंदिर आता महाराजांविना पोरके झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ज्ञानेश्वर मंदिरात महाराजांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत वारकऱ्यांतून व्यक्त केले जात आहे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासा येथून ‘पैस’ खांबाला टेकून जगाला ‘ज्ञानेश्वरी’ या महान ग्रंथाला जन्म दिला. या देवस्थानचा विकास होणे तर सोडाच मात्र, नेवासा येथे राज्यातून येणाऱ्या भाविकांना माऊलीचरणी नतमस्तक होण्यासाठी गर्दीतून वाहनाला मार्ग काढून सोयीचा रस्ता मिळणेही मोठी मुश्किल बाब झालेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचाही संन्याशाची मुले म्हणून एकेकाळी छळ झालेला असताना आता भाविकांनाही महाजांविना हे मंदिर पोरके झाले असल्यामुळे हा सुद्धा भाविकांचा छळच आहे की, काय अशा संमिश्र प्रतिक्रिया भाविकांतून व्यक्त केल्या जात आहे.





