शेख हसीना यांना आणखी एक धक्का ; मुलीची WHO मधून हकालपट्टी ; नेमकं कारण काय ? जाणून घ्या

Saima Wazed । जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना आता मोठा धक्का दिला आहे. कारण शेख हसीना यांची मुलगी सायमा वाजिद यांची WHOमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सायमा WHO च्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक म्हणून काम करत होत्या. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने केलेल्या तक्रारीनंतर शेख हसीना यांच्या मुलीवर ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या अहवालानुसार, WHO चे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी कर्मचाऱ्यांना एक ईमेल पाठवून वाजिद ११ जुलैपासून रजेवर जाणार असल्याची माहिती दिली. ईमेलमध्ये म्हटले आहे की, “जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्यक महासंचालक डॉ. कॅथरीना बोहेमे या संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य संस्थेच्या आग्नेय आशिया प्रादेशिक कार्यालयात (SEARO) सायमा यांची जागा घेतील.”
सायमा वाजिद यांच्याविरुद्ध आरोप Saima Wazed ।
या वर्षाच्या सुरुवातीला, बांगलादेश भ्रष्टाचार विरोधी आयोगाने (ACC) वाजिद यांच्याविरुद्ध तिच्या शैक्षणिक पात्रतेबाबत खटला दाखल केला. ACC ने सायमा यांच्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक प्रमुखपदासाठी तिच्या आईच्या प्रभावाचा वापर केल्याचा आरोपही केला.
अहवालानुसार, तिने खोटा दावा केला की ती बंगबंधू शेख मुजीब मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये मानद पदावर होती, ज्याचा विद्यापीठाने इन्कार केला आहे. असाही आरोप आहे की वाजेद बांगलादेशात तिच्या आई सत्तेत असताना व्यापक भ्रष्टाचारात सहभागी होती.
एसीसीने असा दावा केला आहे की,”तिने तिच्या प्रभावाचा आणि नातेसंबंधांचा फायदा घेत अनेक बँकांमधून सुमारे $2.8 दशलक्ष बेकायदेशीरपणे मिळवले आणि हे पैसे सुचोना फाउंडेशनद्वारे वळवले, ज्याचे ती एकेकाळी अध्यक्ष होती.”
विशेष न्यायाधिकरणाने हसीनाविरुद्धचे आरोप स्वीकारले Saima Wazed ।
बांगलादेशच्या विशेष न्यायाधिकरणाने गुरुवारी शेख हसीनाविरुद्धच्या मानवतेविरुद्धच्या गुन्ह्यांचे आरोप स्वीकारले. गेल्या वर्षी झालेल्या जनआंदोलनाच्या संदर्भात हे आरोप लावण्यात आले होते, ज्यामध्ये शेकडो विद्यार्थी मारले गेले होते. यावर प्रतिक्रिया देताना, हसीनाच्या अवामी लीग पक्षाने सुनावणी प्रक्रियेचा निषेध केला आणि म्हटले की न्यायाधिकरण एक कांगारू न्यायालय आहे.





