The Hundred : पाकिस्तानी खेळाडूंची पुन्हा एकदा नाचक्की! इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेत ५० पैकी एकालाही लागली नाही बोली

No Pakistan players picked in the Hundred draft : पाकिस्तानने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे आयोजन केले होते, ज्यामधून त्यांना पहिल्याच फेरीतून बाहेर पडावे लागले होते. ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेटची जगभरात नाचक्की झाली होती. आता पुन्हा एकदा तसंच घडलं आहे. पाकिस्तानी खेळाडूंना इंग्लंडच्या भूमीवरही अपमानित व्हावं लागलं आहे. येथील द हंड्रेड स्पर्धेसाठी एकूण ५० पाकिस्तानी खेळाडूंनी नोंदणी केली होती. मात्र, कोणत्याही संघाने पाकिस्तानच्या एकाही खेळाडूला घेण्यास रस दाखवला नाही.
कोणत्याही संघाने पाकिस्तानच्या एकाही खेळाडूसाठी दाखवला नाही रस –
पाकिस्तानच्या पन्नास खेळाडूंपैकी ४५ पुरुष आणि ५ महिला क्रिकेटपटू होत्या. या खेळाडूंमध्ये नसीम शाह, इमाद वसीम आणि सॅम अयुब सारखे बलाढ्य खेळाडू देखील होते. ज्यांनी कोणत्याही संघाने घेण्यात रस दाखवला नाही. पाकिस्तानकडून नसीम शाहची राखीव किंमत सर्वाधिक होती, सुमारे १.३५ कोटी रुपये. तथापि, कोणत्याही संघाने नसीमला घेण्यास रस दाखवला नाही. मोहम्मद अब्बास, हैदर अली, शादाब खान, हसन अली सारखे खेळाडूही विकले गेले नाहीत.
🚨 No Pakistan players picked in the Hundred draft. pic.twitter.com/GK2WOioFCl
— Sheri. (@CallMeSheri1_) March 13, 2025
नेमकं काय आहे कारण –
THE HUNDRED MEN'S DRAFT:
Pakistani players registered – 45.
Pakistani players picked – 0. pic.twitter.com/0PvIPREspG
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 13, 2025
पाच महिला क्रिकेटपटूंनीही त्यांची नावे दिली होती पण त्यांनाही खरेदीदार सापडला नाही. काही अहवालांनुसार, द हंड्रेड स्पर्धेत अनेक आयपीएल फ्रँचायझींचा वाटा आहे आणि कदाचित म्हणूनच पाकिस्तानी खेळाडू अनसोल्ड राहिले. भारत आणि पाकिस्तानमधील बिघडलेल्या राजकीय वातावरणामुळे शेजारील देशातील खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. २००८ मध्ये पाकिस्तानी खेळाडू शेवटचे आयपीएलमध्ये खेळताना दिसले होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही पाकिस्तानची झाली होती नाचक्की –
पाकिस्तानने स्वतः आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये त्यांची कामगिरी अत्यंत लज्जास्पद होती. त्यांचा संघ गट टप्प्याच्या पुढे जाऊ शकला नाही. पाकिस्तानला स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाही. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्करला, तर दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने मोहम्मद रिझवानच्या सेनेचा पराभव केला. यानंतर संघाचा बांगलादेशविरुद्धचा शेवटचा सामना पावसामुळे वाया गेला. त्यामुळे पाकिस्तानला अवघ्या चार दिवसांत स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.





