Saif Ali Khan: अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या राहत्या घरात घुसून हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. चोरी करण्याच्या उद्देशाने एका व्यक्तीने सैफवर चाकूने हल्ला केला होता. या घटनेत सैफला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर पोलिसांकडून हल्ला करणाऱ्या आरोपीला अटकही करण्यात आली. आता या संपूर्ण घटनेवर सैफने पहिल्यांदाच भाष्य केले आहे. त्यादिवशी नक्की काय घडले व जखमी झाल्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये कोण घेऊन गेले, याविषयी सैफने सांगितले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने याविषयी सविस्तर माहिती दिली. या घटनेबाबत माहिती देताना सैफने मुलाखतीमध्ये सांगितले की, करिना डिनरसाठी बाहेर गेली होती आणि तो घरीच थांबला होता. ती परत आल्यावर आम्ही काहीवेळ गप्पा मारून झोपी गेले. थोड्या वेळाने घरातील मदतनीस घाईघाईत आली आणि तिने सांगितले की, ‘कोणीतरी घरात शिरले आहे.’ जेहच्या खोलीत एक माणूस आहे, ज्याच्याकडे चाकू आहे आणि तो पैशांची मागणी करत आहे. जेव्हा तो जेहच्या रूममध्ये गेला, त्यावेळी समोरील दृश्य पाहून धक्काच बसला. मला जेहच्या पलंगावर दोन काठ्या घेतलेले माणूस दिसला. त्या काठ्या खरतर हॅक्साब्लेड होत्या. मुलासाठी मी सरळ त्या माणसाला जाऊन पकडले. आमच्यात हाणामारी झाली. तो स्वतःला सोडवण्यासाठी शक्य तितक्या जोरात वार करत होता. धक्क्यामुळे त्यावेळी मला वेदना जाणवल्या नाहीत. मला शरीरावर अनेक जखमा झाल्या. मात्र, नंतर मी त्याला थांबवू शकलो नाही. या माणसाला कोणीतरी माझ्यापासून दूर न्या, एवढीच प्रार्थना त्यावेळी करत होतो, असे सैफ म्हणाला. यावेळी बोलताना घटनेच्या वेळी कुटुंबातील सदस्यांची स्थिती आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याविषयी देखील त्याने माहिती दिली. सैफने सांगितले की, हल्ल्यानंतर माझा कुर्ता रक्तानं माखलेला होता. करिना, तैमूर आणि जेह आम्ही सगळे बिल्डिंगच्या खाली आलो. करिना हॉस्पिलट जाण्यासाठी टॅक्सी, रिक्षा शोधत होती. मी म्हटलं, मला वेदना जाणवू लागल्या आहेत, माझ्या पाठीत काही तरी झाले आहे. त्यानंतर करिना म्हणाली तू हॉस्पिटलला जा, मी माझ्या बहिणीच्या घरी जाते. ‘करिना सगळ्यांना कॉल करत होती, पण कोणीच फोन उचलत नव्हते. आम्ही एकमेकांकडं पाहिलं… मी म्हणालो, ठीक आहे, काळजी करू नकोस, मी मरणार नाही, मला काहीही होणार नाही. तैमूरने देखील मला विचारले, तुम्ही मरणार आहात का? मी त्यावर नाही असे म्हणालो.’, असे सैफने सांगितले. सैफने पुढे सांगितले की, तैमूर शांत होता. त्याला कळत होतं सगळं. त्यानं विचारलं, अब्बा मी तुमच्यासोबत येऊ का? मला तुमच्यासोबत थांबायचं आहे. तो माझ्यासाठी काय करू शकतो हे माहीत असल्यानेच माझ्या पत्नीने तैमुरला सोबत पाठवले. कदाचित त्याक्षणी ते योग्य नव्हतं. पण मला बरं वाटलं. त्यामुळं आम्ही तैमूरलाही सोबत घेतलं. मी, तैमूर आणि हरी तिघे रिक्षातून लिलावती रुग्णालयात गेलो, असे सैफ म्हणाला.