पूरग्रस्तांना शिर्डी साई संस्थानचा मदतीचा हात, 10 कोटी रुपयांची मदत

पुणे – राज्यातील सांगली, कोल्हापूर भागात पुराने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागातून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. शिर्डी येथील साई संस्थानाने देखील आता पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. संस्थानने पूरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची भरीव मदत केली आहे. याच बरोबर डॉक्टरांची टीम आणि औषधे उपलब्ध करुन देणार आहेत, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी ट्विट करून दिली आहे.
Water water everywhere, not a drop to drink, is the situation in Kolhapur, Miraj, Sangli areas of Maharashtra. Govt is doing excellent relief work.Saibaba Sansthan Shirdi has decided to extend monetary help of ₹10 crores & kept team of doctors ready with medicines. ॐ साईराम?? pic.twitter.com/jCuA9I0bWF
— Dr. Suresh Haware (@sureshhaware) August 10, 2019
शिर्डीच्या वतीने राज्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी न्यायालयीन प्रक्रियेस अधिन राहुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती संस्थानच्या अध्यक्षांनी दिली.
डॉ. हावरे म्हणाले, राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या जलप्रलयाच्या थैमानामुळे विशेषताः पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. यामुळे हजारो नागरीक बेघर झाले असून अनेक गावेही उध्दवस्त झालेली आहेत. ही नैसर्गिक आपत्ती भीषण असून आपले राष्ट्रीय कर्तव्य समजुन या पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेने घेतला आहे. सदरचा निधी न्यायालयीन प्रक्रियेस अधिन राहुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असून संस्थानच्या वतीने परिस्थीती बघून वैद्यकीय पथक व औषधे ही पाठविणार आहे.
राज्य शासन पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. राज्यात आलेली ही आपत्ती मोठी असून या आपत्तीतुन बाहेर पडण्यासाठी श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना करीत असल्याचे डॉ. हावरे यांनी सांगितले.





