#Team India : मुख्य प्रशिक्षक द्रविडकडून सुदर्शनचे कौतुक, म्हणाले “त्याचे चांगले भवितव्य आहे पण त्यासाठी…”

जोहान्सबर्ग – भारताच्या एकदिवसीय सामन्यांच्या संघात पदार्पण केलेल्या साई सुदर्शनला चांगले भवितव्य आहे, असा विश्वास भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत सुदर्शनने सलग दुसरे अर्धशतक साकार केले ते पाहता त्याच्याकडे तंत्र आहे, दर्जा आहे, खेळपट्टीवर जास्तीत जास्त काळ उभे राहण्याची क्षमता आहे. हेच मोठ्या खेळाडूचे सर्वात मोठे लक्षण असते. एका परिपूर्ण फलंदाजाकडे काय आवश्यक आहे ते सर्व सुदर्शनकडे आहे, असेही द्रविड म्हणाले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने संघात पदार्पण केले. त्या सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी केवळ 117 धावांची गरज होती. त्यावेळी सलामीवीर ऋतुराज गायकवाड लवकर परतल्यावरही सुदर्शनने कोणताही धोका न पत्करता जबाबदारीने खेळ केला. त्याने नाबाद 55 धावांची खेळी करताना श्रेयस अय्यरला सुरेख साथ देत संघाला विजय मिळवून दिला.
तसेच त्याने मंगळवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यातही जबाबदारीने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या निवडीवरून सुरु झालेली टीकात्मक चर्चा त्याच्या या दोन अर्धशतकी खेळींमुळेच संपली. आता त्याच्या दर्जावर कोणीही बोट ठेवणार नाही. केवळ त्याने भविष्यात आपले संघातील स्थान कायम ठेवण्यासाठी हेच सातत्य दाखवले पाहीजे, असे मतही द्रविड यांनी व्यक्त केले.
आय़पीएलमधील कामगिरी ठरली निर्णायक
आयपीएल स्पर्धेत सुदर्शनने गुजरात टायटन्सकडून जी सातत्यपूर्ण कामगिरी केली तीच त्याच्या भारतीय संघातील निवडीसाठी निर्णायक ठरली. त्याने गुजरातकडून आतापर्यंत 13 डाव खेळताना 500 पेक्षा जास्त धावा केल्या असून त्यात एता 96 धावांच्या खेळीचा समावेश आहे. आता त्याची वर्णी भारतीय संघात लागली आहे त्याने जर हेच सातत्य कायम राखले तर तो भारतीय फलंदाजीतील एक प्रमुख फलंदाज होऊ शकतो.





