IPL 2024 : स्टार्क-कमिन्स स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झाले, तरीही त्यांना पूर्ण पैसे मिळतील का? जाणून घ्या… नियम

IPL Salary Structure & Salary Rules : IPL 2024 साठी मंगळवारी (19 डिसेंबर) झालेल्या लिलावात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांची विक्रमी किंमतीत विक्री झाली. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24.75 कोटींना विकत घेतले, तर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सवर 20.50 कोटींची बोली लावली. या मोठ्या किमतीसह हे दोन्ही खेळाडू आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडूही ठरले आहेत.
पॅट कमिन्स मागील आयपीएलमध्ये मधूनच मायदेशी परतला होता तर दुसरीकडे, मिचेल स्टार्ककडून आयपीएलला कधीच प्राधान्य दिले गेले नाही. त्यामुळेच तो बऱ्याच कालावधीनंतर आयपीएलमध्ये परतला आहे. या दोन खेळाडूंचे प्राधान्य नेहमीच ऑस्ट्रेलियन संघ राहिले आहे. मिचेल स्टार्क नेहमीच अधुनमधून दुखापतग्रस्त राहिला आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की, हे दोन महागडे खेळाडू स्पर्धेच्या मध्यावर दुखापतग्रस्त (जायबंदी) झाले किंवा ते अन्य कारणामुळे उपलब्ध झाले नाहीत, तरीही फ्रँचायझी त्यांना करोडोंचे मानधन देणार का? चला तर समजून घेऊया, नेमकं कसं असतं समीकरण…
आयपीएल वेतनाचा नियम (Salary Rules) काय सांगतो?
आयपीएलमधील खेळाडूंना वेतन देण्याचे नियम अतिशय स्पष्ट आहेत. म्हणजेच, जर एखादा खेळाडू आयपीएलच्या एका हंगामासाठी पूर्ण वेळ उपलब्ध असेल, आणि फ्रँचायझीने त्याला एका सामन्यातही संधी दिली नाही, तर त्याला संपूर्ण हंगामासाठी त्याचे वेतन द्यावेच लागते. पण टूर्नामेंटच्या मध्यभागी वैयक्तिक कारणांमुळे एखादा खेळाडू सामन्यांमध्ये उपलब्ध नसेल किंवा दुखापत झाल्यास त्याला जितक्या सामन्यांसाठी तो उपलब्ध होता तितकेच वेतन मिळते.
अशा परिस्थितीत, कमिन्स आणि स्टार्क आयपीएल हंगामाच्या मध्यभागी दुखापत झाल्यास किंवा इतर कोणत्याही कारणामुळे उपलब्ध नसल्यास, त्यांना हंगामातील सामन्यांमध्ये त्यांच्या उपलब्धतेच्या प्रमाणात पैसे मिळतील. त्याचप्रमाणे एखादा खेळाडू दुखापत झाल्यास किंवा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी उपलब्ध नसेल, तर फ्रँचायझीने त्याला एक रुपयाही देणे बंधनकारक नाही. अशा वेळी फ्रँचायझी त्या खेळाडूच्या जागी दुसरा खेळाडूही घेऊ शकते.





