Sai Kishore Hat-trick : साई किशोरच्या हॅटट्रिकच्या जोरावर तमिळनाडूचा उत्तराखंडवर दणदणीत विजय! एक डाव आणि ६६ धावांनी केली मात
Sai Kishore Hat-trick : तामिळनाडूचा फिरकी गोलंदाज साई किशोरने उत्तराखंडविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यात हॅट-ट्रिक घेतली. चालू हंगामातील तामिळनाडूचा हा दुसरा सामना होता.

Sai Kishore Takes Hat Trick as Tamil Nadu Beat Uttarakhand by an Innings and 66 Runs : रणजी करंडक २०२६-२७ च्या हंगामातील एलिट गट ड च्या सामन्यात तमिळनाडूचा स्टार फिरकीपटू आर. साई किशोर याने आपल्या फिरकीच्या जोरावर कहर केला. चेन्नईच्या मैदानावर उत्तराखंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात साई किशोरने अवघ्या १६ षटकांत ३४ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स घेतल्या. डावातील ४३ व्या षटकात सलग तीन चेंडूंवर तीन गडी बाद करत त्याने थरारक हॅटट्रिक नोंदवली. त्याच्या या भेदक माऱ्यामुळे उत्तराखंडचा संपूर्ण दुसरा डाव अवघ्या ११३ धावांवर आटोपला आणि तमिळनाडूने एक डाव आणि ६६ धावांनी दणदणीत विजय साकारला.
एकाच षटकात तीन विकेट्स; ४३ व्या षटकाचा थरार –
डावातील ४३ वे षटक टाकताना साई किशोरने सामन्याचे चित्र पूर्णपणे बदलून टाकले. षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने लक्ष्य रायचंदानीला (१९) बाद केले, तर पाचव्या चेंडूवर सौरभ रावतला (०) तंबूत धाडले. अखेरच्या चेंडूवर आदित्य रावतला (०) बाद करत त्याने आपली ऐतिहासिक हॅटट्रिक साजरी केली. पहिल्या डावात ४० धावांत ४ विकेट्स घेणाऱ्या साई किशोरने या सामन्यात एकूण १० विकेट्स घेण्याची किमया साधली. तमिळनाडूने पहिल्या डावात ३१३ धावा केल्यानंतर उत्तराखंडला पहिल्या डावात १३४ धावांवर रोखून १७९ धावांची भक्कम आघाडी मिळवली होती.
तमिळनाडूकडून हॅटट्रिक घेणारा आठवा गोलंदाज –
HAT-TRICK IN RANJI TROPHY 😯
Sai Kishore returns six wickets, including a hat-trick, in the second innings to script Uttarakhand’s dramatic collapse.
A 10-wicket haul from the spinner helps Tamil Nadu secure victory by an innings and 66 runs. https://t.co/8t4PWYNWoq
— Cricbuzz (@cricbuzz) October 20, 2026
या ऐतिहासिक कामगिरीसह साई किशोरने माजी दिग्गज गोलंदाज भारत अरुण यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला आहे. रणजी करंडक स्पर्धेत तमिळनाडूकडून हॅटट्रिक घेणारा तो इतिहासातील आठवा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी १९७३ मध्ये बीएस कल्याणसुंदरम, १९८६ मध्ये भारत अरुण, सुनील सुब्रमण्यम (१९९२), दामोदरन देवानंद (१९९९), रामकृष्णन रामकुमार (२००३), एम. मोहम्मद (२०१८) आणि २०२५ मध्ये गुरजपनीत सिंग यांनी हा पराक्रम केला होता. आता २०२६ मध्ये साई किशोरच्या नावावर या विक्रमाची नोंद झाली आहे.
अजित रामची ४ विकेट्स; प्रदोष रंजन पॉल सामनावीर –
दुसऱ्या डावात साई किशोरला फिरकीपटू अजित रामने अप्रतिम साथ दिली. अजितने ३३ धावांत ४ विकेट्स मिळवून उत्तराखंडच्या डावाला अखेरचा सुरुंग लावला. उत्तराखंडकडून एकाही फलंदाजाला तमिळनाडूच्या गोलंदाजीसमोर तग धरता आला नाही. संपूर्ण सामन्यात १० बळी आणि हॅटट्रिक घेऊनही साई किशोरला सामनावीर पुरस्कार मिळाला नाही; पहिल्या डावात १३६ धावांची निर्णायक शतकीय खेळी साकारणाऱ्या प्रदोष रंजन पॉल याला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरविण्यात आले.





