Shooting Coach Sacked : क्रीडा जगतात खळबळ! जंगलात नेऊन महिला खेळाडूंशी अश्लील चाळे करणाऱ्या प्रशिक्षकाची हकालपट्टी
Shooting Coach Sacked : जर्मनी दौऱ्यावर गेलेल्या एका राष्ट्रीय प्रशिक्षकावर महिला नेमबाजांचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

SAI Coach Sacked Sexual Harassment Junior World Championship Germany : भारतीय क्रीडा जगताला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय राष्ट्रीय नेमबाजी पथकासोबत जर्मनी दौऱ्यावर गेलेल्या एका राष्ट्रीय प्रशिक्षकावर महिला नेमबाजांचे लैंगिक शोषण (Sexual Harassment) केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. याप्रकरणी प्राथमिक चौकशीनंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) तात्काळ पावले उचलत संबंधित प्रशिक्षकाला सेवेतून बडतर्फ केले आहे. या घटनेमुळे ऑलिम्पिक पदके जिंकून देणाऱ्या भारतीय नेमबाजी वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
जर्मनीतील जंगलात फिरवण्याचा बहाणा अन् अश्लील चाळे!
ही संतापजनक घटना जून महिन्यात जर्मनीतील सुहल येथे पार पडलेल्या ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपदरम्यान घडली. तेथील शूटिंग रेंज शहराबाहेर फ्राईडबर्ग टेकडीवर होती. तक्रारीनुसार, या राष्ट्रीय प्रशिक्षकाने सरावानंतर महिला खेळाडूला जवळच्या जंगलात फिरण्याच्या बहाण्याने नेले आणि तिथे तिच्याशी लज्जास्पद व गैरवर्तन केले. एवढेच नव्हे, तर पीडितीने विरोध दर्शवल्यानंतर प्रशिक्षकाने तिला ‘नेमबाजी कारकीर्द उद्ध्वस्त करण्याची’ खुली धमकी देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला होता.
तक्रार मागे घेण्यासाठी धमक्या; पालकांच्या तक्रारीकडे सुरुवातीला दुर्लक्ष!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला पीडित महिला नेमबाजाच्या पालकांनी व्यवस्थापनाकडे तोंडी तक्रार केली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, भारतात परतल्यानंतर पीडित खेळाडूने हिंमत दाखवून नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाच्या (NRAI) अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे (ICC) रीतसर तक्रार दाखल केली. या आठवड्यात त्या प्रशिक्षकाने समितीसमोर हजर राहून आपली बाजू मांडली.
चौकशी समितीचा अहवाल येताच गच्छंती; ३ वर्षांपूर्वी झाली होती नियुक्ती!
कमिटीने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आपला गोपनीय अहवाल एनआरएआयकडे सोपवला. अहवालातील तथ्यांच्या आधारे ‘साई’ने तातडीने कारवाई करत संबंधित प्रशिक्षकाला तुघलकाबाद येथील डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजवरून हटवले असून त्याची नोकरी संपवली आहे. तीन वर्षांपूर्वी त्याची नियुक्ती झाली होती. क्रीडा क्षेत्रात महिला खेळाडूंच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





