Sahyadri Sugar Factory : ‘सह्याद्रि’ची साखर पुन्हा झाली ‘कडू’; सभासदांना मोफत साखर देण्याच्या आश्वासनापासून घूमजाव
Sahyadri Sugar Factory : शिरवडे येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मुख्य आश्वासनापासून संचालक मंडळाचे घूमजाव; घरपोच मोफत साखर बंद केल्याने सभासद नाराज.

Sahyadri Sugar Factory : शिरवडे, ता. कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याच्या वर्षभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत सभासदांना मोफत घरपोच साखर देण्याच्या घोषणेपासून विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने घूमजाव केले आहे. त्यामुळे कारखाना कार्यक्षेत्रात सभासदांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात मोफत साखर देण्याच्या आश्वासनामुळे गोड झालेली ‘सह्याद्रि’ची साखर सभासदांसाठी पुन्हा ‘कडू’ झाली आहे.
कारखान्याच्या निवडणुकीवेळी कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांनी सत्ता आल्यास सभासदांना मोफत साखर देण्याची घोषणा केली होती. आधीच विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि त्यानंतर आमदारांनी केलेल्या या घोषणेमुळे पराभवाच्या भीतीने विद्यमान संचालक मंडळानेही त्यांच्या जाहीरनाम्यात सभासदांना मोफत घरपोच साखर देण्याची घोषणा केली.
त्या निवडणुकीत आमदार व इतर नेत्यांमध्ये वैचारिक विसंगती झाल्याने, परिणामी तीन पॅनेलमध्ये निवडणूक झाली. त्यात पुन्हा विद्यमान चेअरमन व माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलची सत्ता आली. आता दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सभासदांना साखर द्यावी लागली. मात्र, बाळासाहेब पाटील हे साखर कारखानदारी गेली पन्नास-बावन्न वर्षे पहात आहेत आणि अनुभवाने प्रशासनही राबवत आहेत. विजयासाठी मिळालेल्या मतांची बेरीज पाहून,
त्यांना कारखाना आपल्याकडून जाऊ शकत नाही, याची खात्री झालेली दिसते. म्हणूनच सभासदांना मोफत साखर देण्याची घोषणा बासनात गुंडाळण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे, अशी चर्चा आहे. वास्तविक शेजारचा कृष्णा कारखाना गेल्या दहा-बारा वर्षांपासून सभासदांना मोफत साखर देत आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या सभासदांनाही या घोषणेच्या अंमलबजावणीची आस लागली होती.
त्यासाठी सभासदांनी विश्वासाने सत्ता पुन्हा विद्यमान संचालक मंडळाला दिली; परंतु सत्ता आल्यावर घोषणा केलेली आणि फक्त एक वर्ष दिलेली मोफत साखर योजना बंद केल्याने अनेक सभासदांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तशी निवेदने, पत्रकार परिषदाही होत आहेत. सभासदांच्या म्हणण्यानुुसार सर्वसाधारण सभा न घेता आणि सभासदांना विश्वासात न घेता, संचालक मंडळाच्या मासिक सभेत हा निर्णय घेण्यात आला.
चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी आपल्यावर अन्याय केल्याची सभासदांची भावना झाली आहे. आमदारकी गेल्यानंतर कारखान्याचीही सत्ता जाईल की काय, या भीतीपोटी मोफत घरपोच साखरेचा निर्णय घेण्यात आला होता का, असा प्रश्न आता सभासद विचारत आहेत. त्यामुळे गोड आश्वासनांची चव आता सभासदांना कडू वाटू लागली आहे.






