Sahitya Parishad Election: साहित्य परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! ‘या’ तारखेला लागणार निकाल; वाचा संपूर्ण वेळापत्रक

प्रभात वृत्तसेवा
पुणे – साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रक्रियेला २२ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असून इच्छुकांना ११ जानेवारीपासून अर्ज वाटप होईल, अशी माहिती परिषदेचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड प्रताप परदेशी यांनी बुधवारी दिली.११ ते १६ जानेवारीमध्ये अर्ज वाटप होणार असून १९ ते २२ जानेवारी दरम्यान अर्ज स्वीकारले जातील. छाननीनंतर वैध अर्ज २३ जानेवारी रोजी जाहीर होतील.
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २५ जानेवारी असून २७ जानेवारी रोजी अंतिम यादी जाहीर होईल. पाच फेब्रुवारी पासून पात्र आजीव सभासदांना मतपत्रिका पोस्टाने पाठवल्या जातील. त्यांनी मतदान करून त्या १३ मार्चपर्यंत परत पाठवायच्या आहेत. १५ मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होईल असे, परदेशी यांनी सांगितले.
कार्यकारी मंडळाने पात्र सभासदांच्या यादीची मूळ प्रत २२ डिसेंबर रोजी निर्वाचन मंडळास दिली.
त्यातील नावे २३ ते २५ डिसेंबर दरम्यान तपासली गोली. अनेक सभासदांनी परिषदेत आपली नावे तपासली. ३० डिसेंबर रोजी निर्वाचन मंडळाने अंतिम मतदार यादी जाहीर केली. निवडणुका पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक अधिकारी गिरीश केमकर, संजीव खडके व प्रभा सोनवणे सहकार्य करत असल्याचे परदेशी यांनी सांगितले.
प्रशासकांनी निवडणूक घ्यावी
प्रशासकाच्या नियंत्रणात मसापची निवडणूक घ्यावी, अशी मागणी करणारी याचिका राजकुमार धुरगुडे – पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका मसापसह राज्य धर्मादाय आयुक्त, मुंबई धर्मादाय उपायुक्त आणि पुण्यातील धर्मादाय सहआयुक्तांच्या विरोधात आहे.साहित्य परिषदेने २०२१मध्ये पाच वर्षांची मुदतवाढ घेतल्यानंतर आता निवडणूक होत आहे.
दरम्यान, परिषदेची कार्यकारिणी बेकायदा असल्याची याचिका साहित्य परिषद संरक्षण कृती समितीने धर्मादाय सहआयुक्तांकडे दाखल केली आहे. धर्मादाय सहआयुक्तांनी निश्चित मुदतीत निर्णय घ्यावा, अन्यथा प्रशासकांच्या नियंत्रणाखाली निवडणूक घ्यावी, असे याचिकेत म्हटले आहे. मुंबई, पुण्यातील धर्मादाय विभागाने एकाच दिवशी तीन वेगवेगळे आदेश काढले. गोपनीय पद्धतीने न्यायाधीश बदलण्याची कृती बेकायदा असल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे.


