सहकारमहर्षि जिल्ह्यात एक नंबरचा दर देणार – मोहिते पाटील

अकलूज – साखर उद्योगधंद्यात स्पर्धा वाढल्याने साखरेच्या दरातील चढ-उतारामुळे कारखानदारी टिकविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यातुनही सभासदांच्या सहकार्याने सहकार महर्षि कारखाना जिल्ह्यात एक नंबरचा दर देण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते – पाटील यांनी दिली. दरम्यान दिवाळी गोड होण्यासाठी कामगारांना 25 टक्के बोनस जाहीर करण्यात आला.
शंकरनगर – अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा 63 वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील व सुलक्षणादेवी मोहिते-पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे आजी-माजी संचालक,सभासद,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कारखान्याने यापूर्वी नऊ वेळा जिल्ह्यात प्रथम क्रमांकांचा ऊस दर दिला आहे. राज्यातही एकवेळ प्रथम क्रमांकाचा दर दिल्याचे स्पष्ट केले. सध्या जिल्ह्यात 5 वरुन 35 साखर कारखाने झाल्याने कारखानदारीत प्रचंड स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे कारखान्याने या गळीत हंगामात 14 लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असुन सभासद व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ते उद्दिष्ट साध्य करणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दसरा-दिवाळीसाठी 25 टक्के बोनसच्या रुपाने गोड शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांनी बिकट काळात दिलेली साथ अनमोल आहे. तशीच साथ यापुढेही देवुन सरासरी 9 हजार टन प्रतिदिन गाळप क्षमतेने चालुन 12 टक्के रिकव्हरी मिळावी, अशी अपेक्षा कामगारांकडुन व्यक्त केली. कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी प्रस्ताविकात गतवर्षीच्या कामकाजाचा आढावा घेत चालू वर्षीच्या गळीत हंगामातील ध्येय, धोरणे स्पष्ट केली.





