पुणे | साबुदाणा स्थिर : भगर, शेंगदाणा महागला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आदिशक्तीच्या उपासनेचे पर्व असलेल्या नवरात्रौत्सवास गुरूवार (दि.३) पासून सुरूवात होत आहे. या नऊ, दहा दिवसांच्या काळात मोठ्या संख्येने भाविक उपवास करतात.
त्यामुळे, उपवासाच्या पदार्थांना मागणी जास्त असते. त्या पार्श्वभूमीवर मार्केटयार्ड भुसार बाजारात शेंगदाणा, साबुदाणा, भगरीची मोठी आवक होत असते. यंदा साबुदाण्याचे भाव स्थिर असून शेंगदाणा आणि भगरीचे भाव किलोमागे ४ ते ५ रुपयांनी वाढले आहेत.
देशात तामिळनाडू येथील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाणाचे उत्पादन होते. तेथून येथील भुसार बाजारात एक्स्ट्रा सुपर फाइन, मिल्क व्हाइट आणि साधा या प्रकारामधील साबुदाणा दाखल होत आहे.
बाजारात दररोज १५० ते २०० टन साबुदाणाची आवक होत आहे. भाव स्थिर असल्याचे व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले.
कर्नाटक, गुजरात आणि राज्याच्या विविध भागातून गुजरात जाडा, कर्नाटक येथुन घुंगरू आणि स्पॅनिश शेंगदाणा बाजारात दाखल होत आहे.
दररोज १०० ते १५० टन आवक होत आहे. हायजॅनिक फुड म्हणून ओळख निर्माण झालेल्या भगरीचे भावही तेजीत आहेत.
दररोज १०० ते १५० टन आवक होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के जास्त भाव मिळत आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि विदर्भातून भगरीच्या कच्च्या मालाची आवक होते. तेथून नाशिक जिल्ह्यातून प्रक्रीया करून माल येथील मार्केट यार्डत दाखल होत असतो.
नवरात्रौत्सवामुळे साबुदाणा, भगर आणि शेंगदाणाला मागणी वाढली आहे. शहर उपनगरांतून या पदार्थांची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत आहे. – अशोक लोढा, व्यापारी, मार्केट यार्ड
घाऊक बाजारात प्रतिकिलोचे भाव
साबुदाणा नं. १ — ७२ रुपये
साबुदाणा नं. २ — ६८ रुपये
भगर नं. १ — १०५-११० रुपये
भगर नं. २ — ९५-१०० रुपये
शेंगदाणा
स्पॅनिश – ११०-१२० रुपये
घुंगरू – १०५-११२ रुपये
हलका – १०० रुपये
टीजे — १००-१०३ रुपये





