पुणे जिल्हा : भगर, राजगिरातून विषबाधा

जुलाब, उलट्याचा त्रास : मांडवगण परिसर भयभीत
मांडवगण फराटा : शिरूर तालुक्यातील पूर्व भागात उपवासाची भगर, राजगिराचे पिठामुळे अनेक नागरिकांना मळमळ, उलट्या, जुलाब होऊ लागले आहेत. प्रामुख्याने मांडवगण फराटा, गणेगाव, तांदळी, इनामगाव येथील लोकांना जास्त प्रमाणात हा त्रास झाला आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
मांडवगण फराटा भागातील प्रत्येक दवाखान्यात १० ते १५ जण या त्रासामुळे दाखल झाले आहेत. शेजारील अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी या गावातील होलसेल व्यापाऱ्यांकडून या सर्वांनी हे भगर, भगरीचे व राजगिराचे पीठ खरेदी करून आणले असल्याचे समजत आहे. मांडवगण फराटा व परिसरातील जवळपास दोनशे ते अडीचशे लोकांना हा त्रास होत आहे. याबाबत अजूनतरी शासकीय पातळीवर कोणतीही कार्यवाही होताना दिसून आली नाही. याबाबत अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, याप्रकरणी माहिती घेऊन पुढील रितसर कारवाई करण्यात येईल.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. नितीन फटाले म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्रात मळमळ, उलट्या, जुलाब या लक्षणाचे पेशंट काही आढळून आले नाहीत. आरोग्य कर्मचाऱ्यांना अशा पेशंटचा सर्व्हे करण्यास सांगून माहिती घेऊन वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात येईल.
सामाजिक कार्यकर्ते औदुंबर फटाले म्हणाले की, आज या भागात अनेक पेशंट मळमळ,उलट्या, जुलाब याने त्रस्त आहेत. अशा घटना घडल्यानंतर समाज तात्पुरता जागा होतो. या घटनेची सखोल चौकशी करावी व दोषी व्यापारी, पुरवठादार यांच्यावर कारवाई व्हावी. ज्यांना या त्रासामुळे नाहक उपचाराचा भुर्दंड पडला आहे. त्यांना भरपाई मिळाली पाहिजे, अशी कारवाई अन्न व भेसळ विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावी, या भागात भेसळयुक्त पदार्थांची बहुतेक ठिकाणी सर्रास विक्री होताना दिसत आहे.





