Jamkhed News : १२ दिवसांची झुंज संपली..! गोळीबारातील जखमी सागर मोहळकरचा पुण्यात मृत्यू, आरोपींचा शोध सुरू
Jamkhed News :

Jamkhed News : जामखेड येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या सागर मोहोळकर याचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या बारा दिवसांपासून पुण्यातील ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र सोमवारी (१६ मार्च) सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास सागर मोहळकर हा जामखेड शहरातील नुरानी कॉलनी रोडवरून पायी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या तीन ते चार जणांनी त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात मोहळकर यांच्या शरीरात चार ते पाच गोळ्या लागल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत समोर आले होते.
गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने जामखेडमधील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार देण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अहिल्यानगर मार्गे पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. ससूनमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीरातून दोन गोळ्या काढल्या होत्या, तर उर्वरित गोळ्या शरीरातच होत्या. मात्र ऑक्सिजनची पातळी कमी होत असल्याने पुढील शस्त्रक्रिया करणे कठीण झाले होते.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ मार्च रोजी जामखेड तालुक्यातील झिक्री गावाच्या शिवारातून अभिमन्यु महादेव पोते (वय २४) याला अटक केली होती. चौकशीत त्याने हा हल्ला माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड, पुणे (फरार), रोहित विठ्ठल आखाडे रा. कोथरुड पुणे (फरार), चिन्या पुर्ण नांव माहित नाही, रा. कोथरुड पुणे (फरार) यांच्यासह केल्याचे सांगितले
या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या अभिमन्यु पोते याला अटक करण्यात आली असून उर्वरित तीन आरोपी फरार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक *दशरथ चौधरी करत आहेत.





