पुणे: शहरातील सदाशिव पेठेतील एका भिंतीला दिलेला हिरवा रंग हटवून तिथे भगवा रंग देण्यात आला आहे. राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भातील पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नेमकं काय घडलं? सदाशिव पेठेतील ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारील एका गल्लीत हिरव्या रंगाने रंगवलेल्या भिंतीवर फुले, अगरबत्ती, आणि चादरींच्या साहाय्याने पूजा करण्यात आल्याची माहिती व्हायरल झाली होती. याची माहिती मिळाल्यानंतर खासदार मेधा कुलकर्णी स्वत: त्या ठिकाणी पोहोचल्या. पाहणी करून त्यांनी हिरव्या रंगावर भगवा रंग चढवला आणि त्या जागी गणपतीची प्रतिमा ठेवली. याचे फोटो आणि व्हिडिओ त्यांनी समाजमाध्यमांवर शेअर केले आहेत. कुलकर्णी यांची भूमिका खासदार मेधा कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पुण्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशा घटना वाढत आहेत. छोट्या स्वरूपात सुरू होणारी ही ठिकाणे नंतर काबीज केली जातात. हिंदूंनी जागरूक राहून सतर्कता दाखवावी.” विरोधकांचा हल्लाबोल या प्रकरणावर शिवसेना (उबाठा) नेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे, “धर्मप्रचार करायचा असेल तर साध्वी व्हा, पण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या खऱ्या समस्यांवर लक्ष द्या. पुण्यातील अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांवर आवाज उठवा, पीडितांना न्याय मिळवून द्या. असा बालिशपणा करण्याऐवजी जास्त महत्त्वाच्या मुद्द्यांवर काम करा.” सतर्कतेचे आवाहन की राजकारण? कुलकर्णी यांच्या या कृतीवरून आणि पोस्टवरून राजकीय वातावरण तापले आहे. समर्थक या कृतीला “हिंदू अस्मितेचे रक्षण” म्हणत आहेत, तर विरोधक याला “दिखावा” आणि “जनतेच्या खऱ्या समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न” असे म्हणत आहेत. आता पुढे काय? सध्या हा विषय सोशल मीडियावर चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. यावरून येत्या दिवसांत आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.