जेएनयुच्या पसिरात लागले “भगवे ध्वज’

नवी दिल्ली – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) बाहेरील रस्त्यावर आणि मुख्य गेटजवळ भगवे झेंडे लावण्यात आले आहेत. या पोस्टर्सवर भगवा जेएनयू असे लिहिले आहे. हे पोस्टर्स आणि झेंडे हिंदू सेनेने लावल्याचे सांगण्यात येत आहे.
जेएनयू प्रशासनाने या घटनेची स्वतंत्र चौकशी सुरू केली असून या घटनेबाबत विद्यार्थ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.
विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहनही विद्यापीठाने केले आहे. यानंतर पोलीस उपायुक्त दक्षिण पश्चिम मनोज सी यांनी सांगितले की, जेएनयूच्या आजूबाजूला काही झेंडे आणि बॅनर रस्त्यावर लावण्यात आल्याचे आमच्या पाहण्यात आले आहेत. ते त्वरीत काढून टाकण्यात आले आहेत आणि योग्य कायदेशीर कारवाई केली जात आहे.
उजव्या विचारसरणीच्या हिंदू सेनेने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या मुख्य गेटवर भगवे ध्वज लावले. संघटनेने कथितरित्या कॅम्पसभोवती पोस्टर चिकटवले होते, ज्यावर भगवा जेएनयू लिहिले होते. याप्रकरणी हिंदू सेनेचे उपाध्यक्ष सुरजित यादव यांचे वक्तव्यही समोर आले आहे.
ज्यात त्यांनी जेएनयूमध्ये विरोधकांकडून भगव्याचा अपमान केल्याचे म्हटले आहे. या लोकांनी सुधारावे भगव्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही तुमचा आदर करतो. प्रत्येक धर्माचा आणि विचारांचा आदर करा. भगव्या रंगाचा ज्या प्रकारे अपमान केला जात आहे हिंदू सेना हे सहन करणार नाही, असे म्हटले आहे.
रामनवमीच्या दिवशी जेएनयूच्या कावेरी वसतिगृहाच्या मेसमध्ये कथित मांसाहार देण्यावरून दोन विद्यार्थी गटांमध्ये हाणामारी झाली तेव्हा दोन्ही बाजूचे डझनभर विद्यार्थी जखमी झाले होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी वसतिगृहात येऊन मेस कर्मचाऱ्यांना मांसाहार बनण्यापासून रोखले आणि तेथे उपस्थित विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी केला होता.
त्याचवेळी, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांनी रामनवमीनिमित्त होणारी पूजा थांबवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपच्या सदस्यांनी केला होता. जेएनयूएसयू, एसएफआय आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने एबीव्हीपीशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.


