नवी मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवणार; एकनाथ शिंदेनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : नवी मुंबईत आता जवळपास सीटिंग नगरसेवकांची संख्या ५३ झाली आहे. तर आणखी प्रवेश शिवसेनेत होत आहेत. त्यामुळे येत्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महापालिकेवर भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शिवसेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी एकनाथ शिंदे बोलत होते.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना कोणत्याच प्रकारचा धोका होणार नाही. त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभे राहणार. तर, शिवसेनेत कोणी घरगडी नसून, सर्व सवंगडी आहेत. पण ठाकरे गटामध्ये सवंगडीला घरगडी समजून वागणूक दिली जात असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
नवी मुंबईतील असणाऱ्या सिडको सोसायटीमधील असणारी कामे नगरविकास विभागाच्या माध्यमातून विशेष निधी देऊनदेखील करण्यात येतील, असे आश्वासन नवी मुंबईकरांना दिले. तर गृहनिर्माण विभागाच्या माध्यमातून नवीनच धोरण येत असून, परवडणारी घरे, भाड्याची घरे, गिरणी कामगारांसाठी घर, जेष्ठांसाठी घर अशा योजना येणार असल्याचेदेखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांनी केला शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेच्या या निर्धार मेळाव्यात काँग्रेसचे नेते अविनाश लाड, प्रणाली लाड, ठाकरे गटाचे बेलापूर महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर त्यांच्या पत्नी कोमल वास्कर, शहर प्रमुख काशिनाथ पवार, मेघाली राऊत, भारती कोळी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटातील वैभव गायकवाड व दिव्या गायकवाड, काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे व त्यांचे पती अंकुश सोनावणे, श्रीवर्धनच्या माजी नगरसेविका आरती शिंदे यांच्यासह श्रीवर्धन, सांगली व सातारा येथील इतर पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.





