Maharashtra Politics : महायुतीत धुसफूस? मंत्रिपदावरून बडा नेता नाराज; मनातलं सगळंच बोलून दाखवलं
Maharashtra Politics : राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी वक्तव्ये पुन्हा एकदा समोर आली आहेत.

Maharashtra Politics : राज्यातील महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे का, असा प्रश्न उपस्थित करणारी वक्तव्ये पुन्हा एकदा समोर आली आहेत. विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी सत्तेतील राजकीय समीकरणांवर भाष्य करताना आपली नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीत नव्याने दाखल झालेल्या नेत्यांना मंत्रिपद मिळाल्याने खोत यांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
रयत क्रांती संघटनेच्या वतीने आयोजित ऊस आणि इथेनॉल परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचे कौतुक करण्यासोबतच सत्तेतील काही नेत्यांवर जोरदार टीका केली. (Maharashtra Politics)
‘बाहेरून सरदार आले आणि मंत्री झाले’
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करत सदाभाऊ खोत म्हणाले की, तळागाळातून आलेला एक सामान्य माणूस पुढे जाऊन दीडशे आमदारांचा नेता होतो, ही मोठी गोष्ट आहे. प्रस्थापित घराण्यातील नेते त्यांच्यासमोर येऊन उभे राहतात, असे सांगत त्यांनी घराणेशाहीवरही निशाणा साधला. (Maharashtra Politics)
मात्र, याचवेळी त्यांनी मंत्रिपदाच्या वाटपावरून आपली नाराजी व्यक्त केली. “पडळकर साहेब, हे सरदार आले आणि साहेबांच्या पायाला लागले. ते मंत्री झाले आणि आपण फक्त बघत बसलो. आपल्यावर काय वाईट वेळ आली,” अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील अंतर्गत राजकारणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
‘प्रस्थापितांनी गावगाडा उध्वस्त केला’
सदाभाऊ खोत यांनी काही नेत्यांच्या कथित कारभाराची चौकशी करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांकडे केली. “या लोकांनी बँका, सूतगिरण्या आणि साखर कारखाने कसे खाल्ले, याचा रिपोर्ट करा,” असे आवाहन त्यांनी केले. प्रस्थापित नेत्यांनी गावगाडा उध्वस्त केल्याचा आरोप करत त्यांनी या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी केली. (Maharashtra Politics)
‘बँक म्हणजे अलीबाबाची गुहा’
बँकेच्या संचालकपदावरूनही खोत यांनी काही राजकीय नेत्यांना टोला लगावला. “आमदाराला बँकेत संचालक व्हावं वाटतं, कारण त्यांना माहिती आहे की बँक ही अलीबाबाची गुहा आहे. त्या गुहेत गेलं की पोतं घेऊनच बाहेर पडता येतं,” अशी बोचरी टीका त्यांनी केली. (Maharashtra Politics)
दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यांमुळे महायुतीतील अंतर्गत नाराजीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. आगामी काळात त्यांच्या वक्तव्यावर महायुतीतील नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)





