Maharashtra Politics : ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी करा; देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी आधी करण्यात आली मागणी

मुंबई : आज मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. एकीकडे हे सुरु असताना दुसरीकडे पक्षातूनच एका आमदाराच्या हकालपट्टीची मागणी जोर धरु लागली आहे.
‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी करा
भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना पक्षातूनच विरोध वाढला आहे. ते भाजपचे विधान परिषदेतील आमदार आहेत. “रणजीतसिंह मोहिते पाटलांसारखी कीड भाजपात नको, त्यांची आमदारकी काढून घेऊन त्यांना पक्षातून काढा” भाजपचे प्रदेश पदाधिकारी संतोष पाटील यांनी अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
अजित पवार बनवणार नवा रेकॉर्ड; सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची घेणार शपथ
का केली जात आहे मागणी ?
“रणजितसिंह मोहिते पाटलांनी लोकसभा आणि विधानसभेला पक्षाच्या उमेदवाराविरोधात काम केले. त्यामुळे त्यांची आमदारकी काढून घ्या आणि पक्षातून हकालपट्टी करा” अशी मागणी केली होती. “रणजितसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा आणि पत्नी हे दोघेही राम सातपुते यांच्याविरोधात प्रचार करत होते. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटलांसारखी कीड पक्षात नको” असे संतोष पाटील म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीपासूनच मोहीते पाटील कुटुंब आणि भाजपमधील अंतर वाढलं
रणजितसिंह मोहिते पाटील हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. लोकसभा निवडणुकीपासूनच मोहीते पाटील कुटुंब आणि भाजपमधील अंतर वाढलं. लोकसभा निवडणुकीत भाजपने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माढ्यातून तिकीट दिलं. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने शरद पवार यांच्या पक्षाची तुतारी हाती घेतली. त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते-पाटील यांनी तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक जिंकली.





