“..ती केवळ बाष्कळ वल्गना” सचिन पायलट यांनी साधला भाजपवर निशाणा

नवी दिल्ली – भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीला यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीत चारशे पेक्षा अधिक जागा मिळतील असा जो दावा केला जात आहे, ती केवळ एक बाष्कळ वल्गना आहे अशी टीका कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी केली आहे. प्रत्यक्ष जमीनीवरील वस्तुस्थिती वेगळी असून त्याची भाजप नेत्यांना कल्पना नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांची इंडिया आघाडी मजबूत असून या एकीला घाबरलेल्या सत्ताधाऱ्यांनी या आघाडी विषयी जाणिवपुर्वक संभ्रम निर्माण करण्याचे काम हाती घेतले आहे असा आरोपही त्यांनी केला. तृणमुल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतच असून त्यांच्याशी असलेला जागा वाटपाचा विषय लवकरच सोडवला जाईल असे त्यांनी नमूद केले. ते आज पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेमुळे इंडिया आघाडीचे जागा वाटप रखडले असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. ते म्हणाले की ही यात्रा आणि जागा वाटपाची चर्चा एकाच वेळी व्यवस्थीत सुरू आहे.
जागा वाटपाच्या चर्चेवर कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे लक्ष ठेऊन आहेत असेही त्यांनी सांगितले. आम्ही लवकरच इंडिया आघाडीचे जागा वाटप आणि आमची भावी रणनिती स्पष्ट करू असेही त्यांनी सांगितले. आम्ही एकजूट आहोत असे त्यांनी यावेळी निक्षुन सांगितले. राहुल गांधी यांची यात्रा सध्या छत्तीसगड मध्ये असून या राज्याचे प्रभारी म्हणून सचिन पायलट तिकडे गेले आहेत लक्ष वेधले.





