Sabarimala Temple : शबरीमलात महिलांना प्रवेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे
केरळच्या शबरीमला मंदिरात (Sabarimala Temple) महिलांना प्रवेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे संबंधित मुद्दा आगामी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याचे संकेत मिळू लागले आहेत

Sabarimala Temple : केरळच्या शबरीमला मंदिरात (Sabarimala Temple) महिलांना प्रवेशाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या राज्यातील विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे संबंधित मुद्दा आगामी निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याचे संकेत मिळू लागले आहेत. शबरीमला मंदिरासह धार्मिक स्थळांवर महिलांबाबत होणाऱ्या भेदभावाविषयीच्या याचिका प्रलंबित आहेत.
त्यावर ७ एप्रिलपासून ९ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी घेण्याचे सूतोवाच सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केले. त्यामुळे केरळमधील वातावरण पुन्हा ढवळून निघाले. त्या राज्यातील विरोधी पक्षांनी डाव्या पक्षांच्या सरकारला घेरण्याचे सत्र सुरू केले. राज्य सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी. तसेच, सर्वोच्च न्यायालयात तातडीने सुधारित प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी मागणी विरोधकांनी केली.
त्यावर सरकारने चर्चेनंतर योग्य भूमिका घेण्याचा सावध प्रतिसाद दिला. याआधी सरकारने महिलांच्या प्रवेशाला पाठिंबा दर्शवला होता. केरळमधील प्रमुख हिंदू संघटनांचा ठराविक वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यास विरोध आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर संबंधित मुद्दा पुन्हा पुढे आल्याने सत्ताधारी डाव्या पक्षांची कोंडी होणार आहे. त्या मुद्द्यावरून केरळमधील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.





