SA vs PAK 1st ODI : सलमान आगाची अष्टपैलू कामगिरी, पाकचा आफ्रिकेवर 3 गडी राखून विजय….

South Africa vs Pakistan 1st ODI : सलमान आगाची अष्टपैलू कामगिरी आणि सॅम अयुबच्या शानदार शतकामुळे पाकिस्तानने पार्लच्या बोलँड पार्क येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तीन गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना 19 डिसेंबर रोजी केपटाऊनमध्ये होणार आहे. सलमानने गोलंदाजीत चार बळी घेतले, तर फलंदाजीत नाबाद 82 धावा केल्या. सलमानला या कामगिरीसाठी सामनावीराचा किताब देऊन गौरविण्यात आले. याशिवाय सॅम अयुबने 109 धावांची खेळी केली. पाकिस्तानने तीन चेंडू राखून विजय मिळवला.
🟢🟡Match Result
An entertaining first ODI concludes.
🇵🇰Pakistan win by 3 wickets in Paarl.
Our Proteas will bounce back in Cape Town on Thursday!👊🏔️🏏#WozaNawe #BePartOfIt #SAvPAK pic.twitter.com/zRWAoXMV6M
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 17, 2024
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 9 बाद 239 धावसंख्येपर्यत मजल मारली होती. क्लासेनने मधल्या फळीत येऊन 97 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह 86 धावांची खेळी केली.
याव्यतिरिक्त सलामीवीर रिक्लेटन 36 धावा करून तर डी जॉर्जी 33 धावा करून बाद झाला. कर्णधार मार्करामने 35 धावा केल्या. या सगळ्यांना सुरुवात चांगली मिळाली पण त्यांना मोठा डाव खेळता आला नाही, परिणामी दक्षिण आफ्रिकेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पाकिस्तानकडून सलमानने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर अबरार अहमदने दोन गडी बाद केले. सॅम अयुब आणि शाहीन आफ्रिदीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने 49.2 षटकात 7 गडी गमावून 242 धावा करत सामना जिंकला. पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. 60 च्या धावसंख्येवर, त्याने 4 शीर्ष क्रमाच्या फलंदाजांच्या विकेट गमावल्या ज्यात अब्दुल्ला शफीक(00), बाबर आझम(23), मोहम्मद रिझवान (01) आणि कामरान गुलाम (04) यांच्या विकेट्सचा समावेश होता.
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर सॅम अयुबने सलमान आगासह डावाची धुरा सांभाळली. दोन्ही फलंदाजांमध्ये पाचव्या विकेटसाठी 141 धावांची भागीदारी झाली. सॅम अयुबने 119 चेंडूत 10 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 109 धावा केल्या, तर सलमानने 90 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अयुबने त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले तर सलमानच्या वनडे कारकिर्दीतील हे पाचवे अर्धशतक होते. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडा आणि बार्टमन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर यानसेन आणि शम्सी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.




