एस.एस.एम.हायस्कूल माळेगाव बुद्रुक १९८३ बॅचचा माणुसकीचा पाठ, झैनबसाठी ५१,००० रुपयांची मदत

माळेगाव बुद्रुक – माळेगाव बुद्रुकमध्ये माणुसकीचा एक उजळ प्रकाश दिसून आला, जेव्हा एस.एस.एम.हायस्कूलच्या १९८३ च्या १०वी बॅचचे माजी विद्यार्थी, बलराम शेतकरी गट, आणि गावातील नागरिकांनी एकत्र येऊन १२ वर्षांच्या झैनब शरीफ शेख हिला वैद्यकीय उपचारासाठी ५१,००० रुपयांची आर्थिक मदत केली.
सिकल सेल आजाराशी झुंजणाऱ्या झैनबसाठी गावकऱ्यांचा हातभार
झैनबला सिकल सेल हा गंभीर रक्तविकार असून, दर महिन्याला नवीन रक्त भरावे लागते. तिच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी तब्बल २५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तिचे वडील शरीफ शेख यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे, त्यामुळे उपचार करणे शक्य नव्हते.
मदतीचा धनादेश – माजी सरपंच दीपक तावरे यांच्या हस्ते प्रदान
सदर मदतीचा धनादेश झैनबचे वडील शरीफ शेख यांना माळेगावचे माजी सरपंच दीपक तावरे यांच्या हस्ते देण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित होते:
– बी.एस. तावरे सर (बलराम शेतकरी गट)
– संग्रामसिंह तावरे
– बाळासाहेब वाघ
– प्रकाश वाईकर
– नंदकुमार जाधव
या सर्वांनी झैनबच्या उपचारासाठी गावकऱ्यांनी एकजुटीने मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन केले.
दीपक तावरे यांचे भावनिक आवाहन
“झैनब या चिमुकल्या जीवासाठी आपण तिच्या वडिलांनी सोशल मीडियावर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत एकत्र आलो आहोत. ही मदत फक्त रक्कम नाही, ती आशेचा किरण आहे. माळेगाव बुद्रुक आणि परिसरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मदत करावी,” असे आवाहन माजी सरपंच दीपक तावरे यांनी केले.
१९८३ बॅचचा आदर्श – शिक्षणातून माणुसकीकडे वाटचाल
एस.एस.एम.हायस्कूलच्या १९८३ बॅचने दाखवलेली ही एकजूट शिक्षणाच्या पायावर उभ्या राहिलेल्या माणुसकीची प्रेरणा आहे.
गावातील तरुणांनीही या घटनेतून झैनबसाठी पुढे येण्याचा संदेश घेतला आहे





