satara | सातारा- हैद्राबाद मार्गावर एस. टी. बसेस देणार – यामिनी जोशी

कोरेगाव, (प्रतिनिधी) – सातारा हैद्राबाद सारख्या आंतरराज्य मार्गावर चांगल्या आणि सुस्थितीतील एस.टी. बसेस दिल्या जातील. त्यांची वेळेवर देखभाल आणि दुरुस्ती केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत प्रवाशांना प्रवासादरम्यान त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पुणे प्रादेशिक विभागाच्या प्रादेशिक व्यवस्थापक यामिनी जोशी यांनी दिली.
जोशी यांनी मंगळवारी सायंकाळी कोरेगाव आगारास भेट दिली व प्रशासकीय कामकाजाची माहिती घेऊन आगार परिसराची पाहणी केली. यावेळी आगार व्यवस्थापक शंकर यादव, वाहतूक निरीक्षक धीरज भुजबळ यांच्यासह वाहतूक आणि कार्यशाळा विभागाचे प्रशासकीय कर्मचारी, वाहतूक नियंत्रक उपस्थित होते.
सातारा जिल्हा एस. टी. प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शहा आणि महाराष्ट्र एस.टी. कर्मचारी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश कदम, संतोष मसणे, विनायक भोसले, विजय भोसले, अमोल कदम, राहूल जंगम, अनिल जाधव, कोरेगाव आगार अध्यक्ष कैलास माने, आगार सचिव सचिनदादा जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन जोशी यांचे स्वागत केले. यावेळी शहा यांनी प्रवाशांच्या वतीने अडीअडचणी मांडल्या तर प्रकाश कदम व सचिन जगताप यांनी चालक, वाहक आणिकार्यशाळा कर्मचारी यांच्या समस्या व अडीअडचणी विषद केल्या.
हैद्राबाद, सोलापूर व अक्कलकोट मार्गावर चांगल्या बसेस दिल्या जातील. स्लीपर कोचेस बसेस जुन्या झाल्या असल्याने त्या बदलून देण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही जोशी यांनी दिली. कोरेगाव आणखी काही बसेस देण्याबाबत नियोजन केले जाईल. शहरी आणि ग्रामीण भागात वेळेवर बससेवा चालवली जाईल, असेही जोशी यांनी स्पष्ट केले.





