IND vs SA : ‘कोहलीमुळेच जमले!’ पहिल्या वनडे शतकानंतर ऋतुराज गायकवाडने सांगितला संपूर्ण ‘स्ट्राइक रोटेशन’चा प्लान

Ruturaj Gaikwad on Virat Kohli: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने शानदार शतक (१०५ धावा) झळकावून हेड कोच गौतम गंभीर आणि कर्णधार केएल राहुल यांचा निर्णय योग्य सिद्ध केला. रांची वनडेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला ऋतुराज अपयशी ठरला होता, पण रायपूरमध्ये त्याने केलेली ही वादळी खेळी भारतीय चाहत्यांसाठी मोठी आनंदाची बातमी ठरली. शतकानंतर ऋतुराजने मानसिक तयारीचा खुलासा केला.
शतक आणि स्ट्राइक प्लॅनचा खुलासा
रायपुरमध्ये शतक झळकावल्यानंतर मिड-इनिंग शोदरम्यान ऋतुराज गायकवाडने आपल्या खेळीचा आणि मानसिक तयारीचा खुलासा केला. तो म्हणाला, “मागील सामन्यात मोठी धावसंख्या न करू शकल्याने मी निराश होतो, पण आज खेळपट्टी खूप चांगली होती आणि परिस्थिती माझ्यासाठी अनुकूल होती. मी ११ व्या षटकादरम्यान फलंदाजीला आलो. तेव्हा मी स्वतःला सांगितले की, पॉवरप्लेनंतर स्ट्राइक रोटेट करायची आहे आणि २५ ते ३० चेंडूंमध्ये स्थिती सावरण्याचा प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीचे १५-२० षटके फलंदाजी थोडी हळू झाली, पण त्यानंतर स्थिती सुधारली.”
विराट कोहलीकडून मिळाले मार्गदर्शन –
Ruturaj Gaikwad said “It’s a dream to bat with Virat bhai, he has helped me a lot”. pic.twitter.com/XxZ2AcygeX
— Johns. (@CricCrazyJohns) December 3, 2025
ऋतुराजने विराट कोहली सोबतच्या भागीदारीचा अनुभव शेअर करताना सांगितले की, कोहलीसोबत फलंदाजी करणे आणि शानदार भागीदारी करणे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे होते. तो म्हणाला, “कोहलीने मला मध्यक्रमात खूप मदत केली. गॅप्स कसे शोधायचे, गोलंदाज कोणत्या लेंथवर गोलंदाजी करत आहे आणि माझ्या तंत्राचा योग्य उपयोग कसा करायचा, याबद्दल त्याने मार्गदर्शन केले. जास्त ‘डॉट बॉल’ न खेळता धावा कशा बनवायच्या, हे शिकण्याचा अनुभव माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता.”
हेही वाचा – Tilak Varma : तिलक वर्मामध्ये संचारला सुपरमॅन! बाउंड्रीवर हवेत डाईव्ह मारत अडवला षटकाराचा चेंडू, पाहा VIDEO
मैदानावरील रणनीती आणि संवाद –
मैदानावर विराट आणि आपल्यात काय चर्चा झाली, हे देखील ऋतुराजने सांगितले. “आम्ही छोटे लक्ष्य ठेवले होते आणि ठरवले होते की पुढील ५ षटकांत ते पूर्ण करायचे आहे. एकदा आम्हाला वाटले की आम्ही सेट झालो आहोत आणि चेंडू बॅटवर चांगला येत आहे, तेव्हा मी माझ्या शैलीवर विश्वास ठेवला. अखेरीस, आम्ही ३५० च्या आसपासचा स्कोअर करण्याचे लक्ष्य ठेवले आणि सुदैवाने आम्ही ते गाठू शकलो.”
हेही वाचा – IND vs SA : विराटच्या बुलेट शॉटने थरकाप उडाला! ऋतुराज थोडक्यात बचावला, पाहा VIDEO
या शानदार शतकी कामगिरीतून ऋतुराजने केवळ आपले पहिले वनडे शतकच साजरे केले नाही, तर विराट कोहलीच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विशाल स्कोअरपर्यंत पोहोचवण्यात मदत केली. मात्र, तरी देखील भारताला ४ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे या दोघांच्या शतकी खेळी व्यर्थ ठरल्या.





