युक्रेनच्या सुमी शहरावर रशियाचा भीषण हल्ला, 20 जणांचा मृत्यू; 83 हून अधिक जखमी

किव्ह- युक्रेनमधील सुमी शहरावर रशियाने केलेल्याक्षेपणास्त्र हल्ल्यात किमान २० जण ठार झाले आहेत. सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सुमी शहराच्या मध्यवस्तीत थडकली. यावेळी शहरातले लोक पाम संडे हा महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते. किमान २० जण या हल्ल्यात ठार झाल्याचे सुमी सहराच्या महापौरांनी म्हटले आहे. तर किमान ८३ जण जखमी झाल्याचे झाले.
जखमींमध्ये ७ लहान मुलांचाही समावेश असल्याचे युक्रेनचे गृहमंत्री इहोर ख्यामेंको यांनी सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून मदत कार्य सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केवळ एखादी घाणेरडी गोष्टच अशाप्रकारे सामान्य लोकांचा जीव घेऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
जागतिक पातळीवरून या हल्ल्याला प्रतिक्रिया देण्यात यावी, असे आवाहन देखील झेलेन्स्की यांनी केले आहे. चर्चेमुळे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि हवाई हल्ले थांबू शकलेले नाहीत. जसे दहशतवाद्यांबरोबर वागायचे तसेच रशियाबरोबर वागले पाहिजे, असेही झेलेन्स्की म्हणाले.
एकच दिवस आगोदर रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांनी एकमेकांवर अमेरिकेच्या पुढाकाराने झालेल्या शांततेसाठीच्या हंगामी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांची भेट घेऊन शांततेच्या शक्यतेची चाचपणी केली होती. रशिया आणि युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचीही अलिकडेच चर्चा झाली होती. तरी दोन्ही बाजूंकडून एकमेकांवरचे हल्ले सुरूच आहेत.





