व्लादिवोस्तोक, (रशिया) – “मेक इन इंडिया’ या धोरणावरून रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. देशांतर्गत उद्योगातील उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासंदर्भात भारतासारख्या भागीदाराच्या यशोगाथेचे रशिया अनुकरण करू शकतो, असे ते म्हणाले. मंगळवारी “इस्टर्न इकॉनॉमिक फोरम’च्या आठव्या परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. रशियन बनावटीच्या कारच्या उत्पादनाच्या मुद्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुतीन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. पूर्वी रशियामध्ये देशांतर्गत बनावटीच्या कार वापरल्या जात नव्हत्या. मात्र आता अशा कार वापरल्या जात आहेत. मर्सिडीज किंवा ऑडी या कारपेक्षा त्या खूपच साध्या दिसतात, हे खरे आहे. मात्र तो काही महत्वाचा मुद्दा नाही. भारतासारख्या आमच्या भागीदाराचे आम्ही अनुकरण केले पाहिजे, असे मला वाटते, असे ते म्हणाले. देशांतर्गत उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढावी, नाविन्यतेला प्रोत्साहन, बौद्धिक संपदेचे रक्षण आणि जागतिक दर्जाच्या उत्पादनासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 2014 मध्ये “मेक इन इंडिया’ उपक्रम सुरू केला होता. या अंतर्गत भारतातील सर्वच क्षेत्रातील उद्योजकताला प्रोत्साहन दिले जाते. मोदी ते योग्यच करत आहेत. रशियातील लोकांनीही रशियातच बनवलेल्या कार वापरायला हव्यात, असे पुतीन म्हणाले. “भारत-मध्यपूर्व- युरोप’ आर्थिक कॉरिडॉरमुळे रशियावर काहीही परिणाम होणार नाही. झाला तर या कॉरिडॉरमुळे रशियाला फायदाच होणार आहे, असेही पुतीन म्हणाले.