ऐन दिवाळीत गुगलचे दिवाळे! ठोठावला 20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000 डॉलर्सचा दंड….

रशियन न्यायालयाने गुगलवर ठोठावलेल्या दंडाचा आकडा वाचून कोणाचेही डोळे गरगरतील असाच आहे. रशियन न्यायालयाने दोन अनडेकिलियन रुबल एवढा दंड गुगलला ठोठावला आहे. हा आकडा कागदरवर लिहायचा म्हणजे, दोनच्या मागे दोन चार नव्हे तर तब्बल ३६ शून्य लावावे लागतील!
डॉलरमध्ये सांगायचं झालं तर हा दंड आहे फक्त आणि फक्त $20,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000 डॉलर्स!
जगातील सर्वाधिक श्रीमंत कंपन्यांच्या यादीमध्ये गुगलचा समावेश आहे, मात्र रशियन न्यायालयाने ठोठावलेल्या या दंडापुढे गुगलची एकूण संपत्ती इनमीन $2 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. दंडाची रक्कम एकूण संपत्तीपेक्षा हजारो पटीने अधिक आहे, एवढंच काय तर जगाचा एकूण GDP अर्थात $110 ट्रिलियन डोलारपेक्षाही पेक्षाही गुगलला ठोठावलेला दंड अधिक आहे!
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी एकाच दमात हा आकडा उच्चारणं अशक्यच असल्याचं कबूल केलंय. पण गुगलला मात्र दंडाकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली आहे. तास्स या राज्य वृत्तसंस्थेनुसार, हा दंड दिवसागणिक वाढत असल्याचे नमूद केले आहे. गुगलने अद्याप याबाबत प्रतिक्रिया दिली नसून ते बहुधा दंडाच्या आकड्याचा हिशेब लावत बसले असावेत.
गुगलने १७ रशियन मीडिया चॅनल्सवर आपले व्हिडीओ प्लॅटफॉर्म असलेल्या यूट्यूबवर निर्बंध लावले. २०२० पासून सुरू झालेल्या वादात आता दंड ठोठावण्यात आल्याने कळस गाठला आहे. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणानंतर बहुतेक पाश्चिमात्य कंपन्यांनी रशियातून काढता पाय घेतला, प्रत्युत्तरात रशियानेही युरोपातील आपले मीडिया चॅनेल्स बंद केले.
२०२२ मध्ये गुगलने रशियातील शाखा दिवाळखोरीत निघाल्याचे जाहीर केले, परंतु गुगलची काही उत्पादने अजूनही रशियात वापरात आहेत. अशातच आता हा नवा दंड ठोठावण्यात आल्याने गुगलला उरला सुरला गाशाही रशियातून गुंडाळण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे!





