India Growth Rate: रशिया -युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका; विकास दर घटणार, पाहा RBIचा अंदाज

मुंबई – एकूण परिस्थिती पाहता चालू आर्थिक वर्षात भारताचा विकास दर 7.8 टक्के राहील असे रिझर्व्ह बॅंकेने जाहीर केले होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशिया- युक्रेन युद्ध सुरू झाल्यामुळे एकूणच वातावरण नकारात्मक झाले आहे. अशा परिस्थितीत रिझर्व बॅंकेने यापूर्वीच्या अंदाजात बदल करून आता विकास दर 7.2 टक्के राहील असे म्हटले आहे.
रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, महाग कच्च्या तेलाबरोबर जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे भारताबरोबरच इतर देशावर परिणाम होणार आहेत. त्यामुळे जागतिक विकास दरही कमी होणार असल्याचे जागतिक पतमानांकन संस्थांनी सांगितले आहे. असे असले तरी हा विकास दर जास्तीत जास्त वाढावा याकरिता रिझर्व बॅंकेने या अगोदर ज्याप्रमाणे प्रयत्न केले होते, त्याप्रमाणे आगामी काळातही प्रयत्न करण्यात येणार असल्याचे दास यांनी स्पष्ट केले.
दोन वर्षापासून जगाप्रमाणे भारत करोनाचा सामना करीत होता. भारताने या काळामध्ये आपले आर्थिक धोरण यशस्वीरीत्या राबविले. त्यामुळे त्या भारताची जास्त मनुष्य हानी न होता विकास दर वाढत होता. मात्र सर्व परिस्थिती पूर्वपदावर येत असतांना 24 फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवरील सर्व समीकरणे बदलली असल्याचे दास यांनी सांगितले. रशिया- युक्रेन युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर कमीत कमी नकारात्मक परिणाम व्हावा याकरिता अर्थमंत्रालय प्रयत्न करीत आहे.
त्याचबरोबर रिझर्व बॅंक आगामी काळात हा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे दास यांनी सांगितले. मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. आगामी काळातही या उत्पादकतेवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. मात्र एकूणच इंधन महाग झाल्यामुळे त्याचा अर्थव्यवस्थेच्या विविध घटकावर नकारात्मक परिणाम होणे साहजिक असते. हा परिणाम कमीत कमी व्हावा याकरिता आवश्यक त्या उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.





