Russia-Ukraine war : रशियाने युक्रेनच्या उर्जाविषयक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा मारा केला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा मोठा हल्ला करण्यात आला,. रशियाबरोबर गेल्या ३ वर्षांपासून सुरू असलेले युद्ध समाप्त करण्याच्या उद्देशाने पुढील आठवड्यात अमेरिकेबरोबर चर्चा केली जाईल, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. त्यानंतर रशियाने हा मोठा हल्ला केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. रशियाने युक्रेनच्या उर्जाविषयक पायाभूत सुविधांवर केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रंच्या माऱ्यात किमान १० जण जखमी झाले. त्यात एका बालकाचाही समावेश असल्याचे युक्रेनचे उर्जा मंत्री हरमन हलुशेचेंको यांनी पेसबुकवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. युक्रेनच्या सर्वसामान्य नागरिकांचा वीज आणि गॅस पुरवठ्याच्या केंद्रांंना रशियाकडून लक्ष्य केले जाते आहे. आम्हाला अंधारात, उष्णतेशिवाय राहू देण्याचेच रशियाचे उद्दिष्ट आहे. याचा सर्वाधिक त्रास सामान्य नागरिकांनाच होतो आहे, असेही उर्जा मंत्र्यांनी म्हटले आहे.कडक हिवाळ्याचा रशियाकडून शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचा आरोपही अधिकाऱ्यांनी केला आहे. तर उर्जा पायाभूत सुविधा हे युद्धामधील एक कायदेशीर लक्ष्य आहे. कारण या सुविधा थेट लष्करी उद्योगांशी आणि शस्त्रास्त्र निर्मितीशी जोडलेल्या असतात, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेश्कोव्ह यांनी म्हटले आहे. रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने शुक्रवारी युक्रेनने डागलेली ३९ ड्रोन पाडली असल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. रशियाकडून गॅस उत्पादन कंपनी असलेल्या डीटीईकेवर केलेला हल्ला हा गेल्या अडीच आठवड्यात केलेला सहावा हल्ला होता. रशियाने हवाई, जमीन आणि समुद्रातून ६७ क्षेपणास्त्रे डागली आणि १९४ स्ट्राइक आणि डिकॉय ड्रोन सोडले असल्याचे युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.