Russia-Ukraine War: मारिऊपोलमध्ये सापडले 200 मृतदेह

किव्ह – रशियाने ताबा घेतलेल्या मारिऊपोलमधील उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखालून आतापर्यंत 200 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मातीचे ढिगारे उपसण्याचे हे काम अजूनही सुरू आहे. रशियाने तीन महिन्यांपूर्वी सुरू केलेल्या हल्ल्यापासून दुसऱ्यांदा रशियाच्या क्रूरतेचे चित्र यामुळे जगासमोर आले आहे.
रशियाच्या तोफांच्या माऱ्यात पडलेल्या इमारतीच्या तळघरामध्ये हे मृतदेह होते. बाहेर काढले तेंव्हा हे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती. त्याचा वास आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरला होता, असे मारिऊपोलच्या महापौरांच्या सल्लागारांनी सांगितले. युद्धाला सुरुवात झाली तेंव्हापासून मारिऊपोलमधील सैनिकांनी रशियाचा जोरदार प्रतिकार केला होता. तेथील पोलाद उद्योगाला वाचवण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून हा प्रतिकार सुरू होता.
मारिऊपोल रशियाने जिंकल्यानंतर आता रशिया अगदी थोड्या आठवड्यातच युक्रेनचा पूर्ण पराभव करेल, असे भाकित वर्तवले जाऊ लागले आहे. मात्र पाश्चात्य देशांकडून मिळालेल्या युद्धसामुग्रीच्या आधारे युक्रेनच्या सैनिकांकडून अजूनही जोरदार प्रतिकार केला जातो आहे.
डोनबास आणि लुहान्सक या दोन प्रांतांवर ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. जोनबासवरील हल्ल्यासाठी रशियाने खारकिव्ह या दुसऱ्या क्रमांकाच्या शहराभोवताचे आपले काही सैन्य वळवले आहे. या शहरातील नागरिकांना दैनंदिन गरजेच्या अन्नधान्यासाठी लांब रांगा लावाव्या लागत आहेत. तेथेच आता रशियन सैन्याचा तळ सुरू करण्याचा रशियाचा विचार आहे.
रशियाने सर्वंकश युद्ध लादले- झेलेन्सकी
रशियाने युक्रेनवर सर्वंकश युद्ध लादल्याचा आरोप युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्सकी यांनी केला आहे. युक्रेनचे जेवढे म्हणून नुकसान करता येऊ शकणार होते, तेवढे नुकसान रशियाने केले आहे. तसेच जीवितहानीदेखील केली असल्याची टीकाही जेलेन्सकी यांनी केली आहे. युरोपात गेल्या 77 वर्षात एवढे भीषण युद्ध झालेले नाही. गेल्या आठवड्यात राजधानी किव्ह पासून 55 किलोमीटर अंतरावरील देसना गावावर रशियाने डागलेल्या क्षेपणास्त्रांमुळे 87 लोक टार झाले आहेत, याकडे झेलेन्सकी यांनी लक्ष वेधले. अशासारखी शेकडो क्षेपणास्त्रे रशियाने 24 फेब्रुवारीपासून युक्रेनवर सोडली आहेत, असेही झेलेन्सकी म्हणाले.





