कीव्ह – रशिया आणि युक्रेन यांनी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात कैद्यांची अदलाबदल सुरू केली, असे युक्रेनच्या लष्करी सूत्रांनी शुक्रवारी सांगितले. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ चाललेल्या युद्धासंदर्भात पहिल्यांदाच दोन्ही बाजूंंमध्ये या निमित्ताने सहमती झाली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की कैद्यांची देवाणघेवाण आधीच पूर्ण झाली आहे परंतु कीव आणि मॉस्कोकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. ही देवाणघेवाण अजूनही सुरू आहे, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात इस्तंबुलमध्ये झालेल्या दोन तासांच्या थेट चर्चेदरम्यान रशिया आणि युक्रेनने कैद्यांच्या आदलाबदलीला मान्यता दिली होती. मात्र पहिल्यांदाच झालेल्या या थेट चर्चेदरम्यान युद्धबंदीसंदर्भात कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नव्हता. रशिया आणि युक्रेनदरम्यानच्या युद्धात दोन्ही बाजूंचे लाखो सैनिक जखमी किंवा मारले गेले असल्याचे मानले जाते आहे. दोन्ही बाजूंनी मृतांची नेमकी संख्या प्रकाशित केली नाही. अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या ३० दिवसांच्या युद्धबंदीला युक्रेनने मान्यता दिली आहे. मात्र जोपर्यंत आपल्या अटी मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत युद्धबंदी होणार नाही, असे रशियाने म्हटले आहे. शांतता प्रक्रियेसाठीच्या वाटाघाटी रशियाने रोखून धरल्यास रशियावरील निर्बंध अधिक तीव्र करण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.